एअर इंडियाच्या विमानांमध्ये आज महिलाराज
१२ आंतरराष्ट्रीय आणि ४० हून अधिक देशांतर्गत विमानांचे सारथ्य महिलांकडे
नवी दिल्ली: महिला दिनानिमित्त शुक्रवारी उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या सर्व विमानांची सूत्रे महिला कर्मचाऱ्यांच्या हातात देण्यात आली आहेत. त्यानुसार एअर इंडियाच्या सर्व १२ आंतरराष्ट्रीय आणि ४० हून अधिक देशांतर्गत विमानांचे सारथ्य केवळ महिला पायलट करणार आहेत. तसेच या विमानांमध्ये केवळ महिला क्रू मेंबर्स असतील. या विमानांमध्ये एअर इंडियाच्या एअरबस आणि ड्रिमलाईनर्स या विमानांचाही समावेश असेल.
एखाद्या हवाई कंपनीने अशाप्रकारे महिलांच्या हाती सर्व धुरा देण्याचा निर्णय अनोखा आहे. हा एक नवा मापदंड आहे. यामुळे कोणत्याही संस्थेत महिलांना समान संधी आणि जबाबदारी देण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल. आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले. यापूर्वी नोव्हेंबर १९८५ मध्ये एअर इंडियाने असाच निर्णय घेतला होता.
डू नॉट से यू आर वीक, बिकॉझ यू आर वूमन... डुडलद्वारे महिला दिनाच्या शुभेच्छा
त्यामुळे आज एअर इंडियाच्या दिल्ली-सिडनी, मुंबई-लंडन, दिल्ली-रोम, दिल्ली-लंडन, मुंबई-दिल्ली-शांघाय, दिल्ली-पॅरिस, मुंबई-नेवार्क, मुंबई-न्यूयॉर्क, दिल्ली-न्यूयॉर्क, दिल्ली-वॉशिंग्टन, दिल्ली-शिकागो आणि दिल्ली-सॅनफ्रान्सिस्को या विमानांची संपूर्ण धुरा ही उच्च प्रशिक्षित महिलांच्या हाती असणार आहे.