Air India : विमान प्रवासाची उत्सुकता अनेकांनाच असते. पण, प्रत्येक वेळी  विमान प्रवासादरम्यान चांगलाच अनुभव येईल असं नाही. कारण अनेकदा हा प्रवास मनस्तापाव्यतिरिक्त आणखी काहीही देत नाही, असं म्हणणारेही कमी नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक पोस्ट वाचून लगेचच याचा अंदाज येत आहे. 


एअर इंडियाचा प्रवास नव्हे, मनस्ताप... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

X च्या माध्यमातून विनित के नावाच्या एका युजरनं त्याच्या विमानप्रवासाचा अनुभव सर्वांसमोर ठेवला. या प्रवासामध्ये या प्रवाशानं चक्क बिझनेस क्लासनं प्रवास करताना आपला कसा अपेक्षाभंग झाला आणि पश्चातापातच प्रवास करताना किती वाईट अनुभव आले याविषयीचा संताप व्यक्त केला. 


'एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं...' असं सांगत या प्रवाशानं स्वत:च्या प्रवासाची Horror Story सर्वांसमोर आणली. इथं त्यानं प्रवासादरम्यान खटकलेल्या गोष्टंची मुद्देसूद मांडणी केली. जवळपास 5 लाख रुपयांच्या (राऊंड ट्रीप) तिकिटावर अशा सुविधा देण्यात येतात हे पाहून हा प्रवासीच नव्हे, तर त्याची पोस्ट वाचणारी मंडळीही थक्क झाली. 
 
पोस्टमध्ये या प्रवाशानं काय लिहिलं? 


''एअर इंडियासोबतची हॉरर स्टोरी. Delhi - Newark (AI 105)


एमिरट्ससोबत काही वर्षे प्रवास केल्यानंतर मी एअर इंडियाकडे वळलो, कारण मी वारंवार कामासाठी जातो त्या लंडन, शिकागो आणि न्यूयॉर्कला त्यांच्याकडून खेट विमानं उपलब्ध असतात. पण, कालचा प्रवास मात्र एखाद्या वाईट स्वप्नाहून कमी नव्हता. 


कामानिमित्त बिझनेस क्लासचं तिकीट घेतलं, पण विमानातील सीट अतिशय खराब होत्या. 35 पैकी 5 सीट बिघडल्या होत्या. विमानाचं उड्डाण 25 मिनिटं उशिरानं झालं. टेक ऑफनंतर 30 मिनिटांनी साधारण पहाटेच्या साडेतीन वाजण्याच्या सुमारास मी झोपायला गेलो तर, माझी सीट फ्लॅट बेडमध्ये रुपांतरीत करता येत नव्हती. कारण होतं ती बिघडलीये.... 


विनंती केल्याच्या 10 मिनिटांनंतर मला दुसरी सीट देण्यात आली. काही तासांनी उठल्यानंतर खाणं देण्यात आलं. जे व्यवस्थित शिजलं नव्हतं. सहसा एअर इंडियामध्ये जेवणाची तक्रार नसते. फळं खराब होण्याच्या अवस्थेत होती अशी तक्रार विमानातील अनेकांनीच केली. टीव्ही काम करत नव्हता, प्रयत्न करूनही त्यावर Not Found एरर येत होता. या साऱ्यामध्ये आणखी एक भर... त्यांनी माध्या सामानाचं नुकसान केलं होतं. 


वाईट जेवण, अस्वच्छ आणि बिघडलेल्या सीट, बिघडलेला टीव्ही, नुकसान पोहोचलेलं सामान हे सर्व पाच लाख रुपयांच्या प्रवासी भाड्यामध्ये....'' 



हेसुद्धा वाचा : मोठी बातमी: सरकारी कर्मचाऱ्याचं निवृत्तीसाठीचं वय इथून पुढं... 



इथं या प्रवाशानं लांबलचक पोस्ट लिहित मनस्ताप शब्दांवाटे व्यक्त केला. तर, तिथं एअर इंडियानं ही बाब लक्षात घेत घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 'आमच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची आमची इच्छा नसते. हा मुद्दा आम्ही लक्षात आणून देत असून, त्यावर पुढील कारवाई होईल' अशी हमी देत प्रवाशाचा संताप शमवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, एअर इंडिया आणि इतरही विमान प्रवासांदरम्यान आलेल्या अनुभवांचं कथन यावेळी या पोस्टच्या कमेंटमध्ये X युजर्सनी केल्याचं पाहायला मिळालं.