`एयर इंडिया`कडून महात्मा गांधींच्या आठवणीत खास पोट्रेट
महात्मा गांधींचे खास पोट्रेट
नवी दिल्ली : देशभरात महात्मा गांधी यांची १५०वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने विमान कंपनी 'एयर इंडिया'ने (Air India)राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या अंदाजात श्रद्धांजली दिली आहे. 'एयर इंडिया'ने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एयरबस ३२० च्या (Airbus 320) टेलवर महात्मा गांधी यांचे पोट्रेट पेन्ट करुन त्यांना श्रद्धांजली दिली आहे.
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची ११६वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने देशभरात अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावर बापूंना आदरांजली वाहिली. राजघाटनंतर पंतप्रधानांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळावर विजय घाट येथे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना नमन केले.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनीदेखील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डादेखील राजघाटावर आयोजित प्रार्थना सभेत सहभागी झाले होते.