मुंबई : प्रवाशांचा प्रवास सुखर बनवण्याच्या दृष्टीनं सरकारनं आणखीन एक पाऊल पुढे टाकलंय. विमानप्रवास करताना विमानतळावर प्रवाशांना तपासणीचा त्रास होऊ नये यासाठी चेकिंग सिस्टमही सोप्पं करण्यात येतंय. यामध्ये आता विमानतळावर प्रवाशांना आपली ओळख पटवण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज लागणार नाही. तर प्रवाशांचा चेहराच त्यांचं ओळखपत्र असेल. 'चेहरा स्कॅनिंग'नंतर प्रवाशांना बोर्डिंग पास दिला जाईल. या सुविधेला 'डिजीप्रवास' असं नाव देण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारकडून बायोमॅट्रिक सेल्फ बोर्डिंग टेक्नॉलॉजी सुरू करण्यात येतेय. प्रयोगधर्तीवर ही सुविधा सध्या कर्नाटकच्या बंगळुरू विमानतळावर सुरू करण्यात आलीय. बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (बीआयएएल) वर नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं प्रवाशांचा चेहरा पाहून एअरपोर्टवर प्रवेश तसंच त्यांना बोर्डिंग पासही दिला जातोय. 


बंगळुरूनंतर ही सुविधा दिल्ली, मुंबई, हैदराबाद तसंच वाराणसी, विजय वाडा, पुणे, कोलकाता या विमानतळांवरही सुरू करण्यात येणार आहे.


बंगळुरू विमानतळाच्या प्रशासनानं या कामासाठी विजय बॉक्स नावाच्या कंपनीशी करार केलाय. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या जेट एअरवेज, एअर एशिया तसंच स्पाईसजेटच्या प्रवाशांना ही सुविधा दिली जाईल... याची सुरुवात येत्या वर्षात मार्च महिन्यापर्यंत होईल.