नवी दिल्ली : दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी हवामानात बदल झालाय. धुळीच्या वादळामुळे अनेक समस्या निर्माण होण्याचा इशारा देण्यात आलाय. अनेकांना धुळीमुळे श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. दूषणकारी धुरक्यामुळे दिल्लीकरांचा 'श्वास कोंडला' आहे तर पंजाबचं आभाळही धुळीच्या वादळाने व्यापले आहे. दोन दिवसांपूर्वी राजस्थानात धुळीचे वादळ झाले. जोरदार वाऱ्यामुळे हे वादळ दिल्लीकडे सरकले. त्याचा दिल्लीकरांना सामना करावा लागत आहे. दिल्लीत धुळीने आकाश आच्छादलेय. या धुळीमुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानातील धुळीच्या वादळाचा तडाखा दिल्लीला बसला असून दिल्लीचं आभाळ आजही धुरक्याने व्यापलेले आहे. दिल्लीत आधीच प्रदूषणाचे प्रमाण गंभीर असताना धुळीच्या आच्छादनाने स्थिती अधिकच बिकट झाली आहे. दिल्ली-एनसीआर भागात आणखी तीन दिवस असंच वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर गुडगावमध्येही पुढील तीन दिवस कोणत्याही प्रकारच्या बांधकामास हरियाणा सरकारने मनाई केली आहे. 



दरम्यान, या धुळीच्या वादळाचा तडाखा उत्तर प्रदेशातही विविध जिल्ह्यांना बसला असून गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या घटनांत १५ जणांचा मृत्यू तर २८ जण जखमी झाले आहेत. सीतापूर, गोंडा, कौशंबी, फरिदाबाद, हरदोई आणि चित्रकुट या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे.


दरम्यान, दक्षिण आणि ईशान्येकडील भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. ईशान्यकडे त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूर या राज्यांमध्येही पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या भागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्रिपुरात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून कोझिकोड आणि कुन्नूर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.