Sukhbir Badal Guilty: शिखांची सर्वोच्च संस्था अकाल तख्तने 2015 मध्ये गुरू ग्रंथ साहिबच्या अपमानाच्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची बाजू घेतल्याबद्दल पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर बादल यांना शिक्षा सुनावली आहे. तसेच, सुखबीर यांचे वडील आणि पंजाबचे दिवंगत माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्याकडून फखर-ए-कौम सन्मान काढून घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षा म्हणून सुखबीर बादल आणि तत्कालीन अकाली सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांना स्वर्णमंदिरातील खरकटी भांडी आणि शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी सुखबीर बादल यांना तनखैया (धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी) घोषित करण्यात आले होते.


सुखबीर बादल यांच्याबाबत सोमवारी अकाल तख्त येथे पाच सिंग साहिबांची बैठक झाली. अकाल तख्तचे जथेदार ज्ञानी रघुबीर सिंग यांनी सुखबीर यांचा पक्ष शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीला सुखबीर बादल यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर तीन दिवसांत अकाल तख्तला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.


वादग्रस्त निर्णय ठरले शिक्षेचं कारण


2007 ते 2017 या काळात अकाली दल सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांमुळे सुखबीर बादल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकाल तख्तच्या मंचावरून, ज्ञानी रघबीर सिंग यांनी दोषी अकाली नेत्यांना त्यांच्या गळ्यात फलक घालण्यास सांगितलं, जेणेकरून त्यांनी आपला अपराध स्वीकारला आहे असा संदेश जाईल.



अकाल तख्तने दिवंगत प्रकाशसिंग बादल यांच्याकडून फखर-ए-कौम पदवी काढून घेण्याचाही निर्णय घेतला. ज्यावेळी ते राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा या चुका झाल्या आणि या चुकांमुळे शीख धर्म आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असं त्यांनी म्हटलं आहे. 


लंगर हॉलमध्येही सेवा 


30 ऑगस्ट रोजी सुखबीर यांना 'धार्मिक शिक्षे' अंतर्गत 'तनखैया' घोषित करण्यात आलं. अलीकडेच, त्यांच्या पायात हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्यामुळे, त्याची प्रकृती लक्षात घेऊन सुखबीर यांनी व्हीलचेअरवर बसून गार्डच्या पोशाखात स्वर्णमंदिराच्या प्रवेशद्वारावर सेवा करण्यास सांगण्यात आलं. वय आणि तब्येत यामुळे सुखदेव धिंडसा यांनाही अशीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. यांना गुरु रामदासजी लंगर हॉलमध्येही सेवा करण्यास सांगितले आहे.


तख्तने या चुकांना पाप म्हणून संबोधलं आहे. तसंच 2007-2017 दरम्यान पक्षाच्या राजवटीत घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांशी संबंधित प्रश्नांना 'होय' किंवा 'नाही' उत्तर देण्यास सुखबीर यांना सांगण्यात आलं. ईश्वरनिंदेच्या आरोपाचा सामना करणाऱ्या सिरसा-आधारित डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला 2015 मध्ये देण्यात आलेल्या वादग्रस्त माफीने कारवाईची सुरुवात झाली.


ज्ञानी रघबीर सिंग यांनी सुखबीर यांना डेरा प्रमुखाला माफी मिळवून देण्यात त्यांच्या 'संदिग्ध भूमिके'बद्दल त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची सत्यता उघड करण्यास सांगितलं आहे.