अखिलेश यादव आणि आझम खान यांचा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा
समाजवादी पक्षाचे (सपा) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि आझम खान (Azam Khan) यांनी आज लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे (सपा) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आज लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव यांनी आजमगढ लोकसभा मतदारसंघातून तर आजम खान (Azam Khan) यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघातून आपल्या खासदारकीच राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव करहल मतदारसंघातून तर आजम खान हे रामपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार होता. (Akhilesh Yadav and Azam Khan Resign as a MP)
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आज लोकसभेत पोहोचले. येथे त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला. अखिलेश यादव आता उत्तर प्रदेशच्या विधानसभेत विरोधीपक्षाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राष्ट्रीय राजकारणातून ते पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार आहेत. अखिलेश यादव आता आमदार म्हणून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय राहणार आहेत.
अखिलेश यादव आणि आजम खान यांच्या राजीनाम्यानंतर आता समाजवादी पक्षाच्या खासदारांची संख्या 5 वरुन 3 झाली आहे. दोन्ही जागा रिक्त झाल्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा पोटनिवडणूक घेतली जाईल.
खासदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी अखिलेश यादव सोमवारी आपल्या मतदारसंघात पोहोचले होते. येथे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
सपाचे आणखी एक नेते आजम खान यांनी देखील खासदारकीचा राजीनामा दिला. ते देखील आता राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार आहेत.