लखनऊ- अलाहाबाद विद्यापीठातील एका कार्यक्रमासाठी निघालेले समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना मंगळवारी लखनऊ विमानतळावरच अडविण्यात आले. त्यांना प्रयागराजला जाण्यापासून रोखण्यात आल्यामुळे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. अनेक कार्यकर्त्यांनी विमानतळावर जाऊन पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. खुद्द अखिलेश यादव यांनीच ट्विटच्या माध्यमातून आपल्याला विमानतळावर रोखण्यात आल्याचे सर्वांना सांगितले. कोणताही लेखी आदेश नसताना मला विमानतळावर रोखण्यात आले आहे. समाजवादी विचारांना रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलल्याचे सांगितले. ते म्हणाले, अखिलेश यादव जर अलाहाबाद विद्यापीठात आले तर तिथे विद्यार्थी संघटनांमध्ये वादावादी होऊ शकते. यामुळे प्रयागराजमधील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. सध्या तिथे कुंभमेळा सुरू आहे. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्था आहे. अखिलेश यादव विद्यापीठात येऊन वादग्रस्त बोलले, तर विद्यापीठातील वातावरण बिघडू शकते, असे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी म्हटले आहे. त्यामुळेच प्रशासनाने अखिलेश यादव यांना विमानतळावर रोखल्याचे आदित्यनाथ यांनी सांगितले.



दरम्यान, अखिलेश यादव यांना रोखण्याचे गंभीर पडसाद मंगळवारी उत्तर प्रदेश विधानसभेतही पाहायला मिळाले. समाजवादी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी करीत या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.