लखनऊ : देशात असलेल्या भाजप राजवटीत पत्रकार सुरक्षित नाही, असा आरोप उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. कुशीनगर येथील एका आयोजित कार्यमात अखिलेश बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे उदाहरण देत अखिलेश यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. अखिलेश म्हणाले, जे पत्रकार भाजपच्या विरोधात लिहीतात ते सुरक्षित नाहीत. बंगरूळुतील महिला पत्रकार आणि 'गौरी लंकेश पत्रिके'च्या संपादिका गौरी लंकेश यांनीही भाजपच्या विरोधात लिखान केले होते. पाच सप्टेंबर या दिवशी अज्ञातांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यातून भाजप राजवटीत पत्रकार सुरक्षित नसल्याचे पुढे आल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे.


दरम्यान, कर्नाटक सरकारने पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची माहिती देणाऱ्यास १० लाख रूपयांचे इनाम जाहीर केले आहे. कर्नाटकचे गृहराज्यमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. या हत्येची माहिती देण्यासाठी सरकारने इमेल आयडी आणि फोन नंबरही दिला आहे.