अखिलेश यादव यांची मोदींवर तिखट प्रतिक्रिया
नरेंद्र मोदी यांच्यावर ७२ वर्षांसाठी बंदी घालावी, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली.
लखनऊ : वाराणसीत आपला उमेदवार गमावल्यानंतर तिखट प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर ७२ तासांची नव्हे तर ७२ वर्षांसाठी बंदी घालावी, अशी मागणी केली. मोदी सव्वाशे कोटी देशवासीयांच्या विश्वास गमावून बसले असल्याची टीकाही अखिलेश यादव यांनी केली.
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सपा आणि बसपाचे संयुक्त उमेदवार तेज बहादुर यादव यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द झाला आहे. तेज बहादुर यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे कारण वेळेत स्थानिक निवडणूक आयोगासमोर सादर करणे बंधनकारक होते. मात्र तसे करण्यात तेज बहादुर अपयशी ठरले असल्याने, त्यांचा उमेदवारी अर्ज निकाली निघाला.
यामुळे सपा आणि बसपाला जोरदार राजकीय धक्का बसला असून, वाराणसीतून त्यांच्या पक्षांची उमेदवारीच संपुष्टात आली आहे. रागिणी यादव या सपाच्या नेत्यांचं तिकीट कापून ऐन वेळी तेज बहुदरना उमेदवारी देण्यात आली होती. स्थानिक निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात यादव सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.