अयोध्येत लष्कराला पाचारण करा; अखिलेश यादवांची मागणी
आम्हाला बाबरी मशीद पाडायला फक्त १७ मिनिटं लागली
लखनऊ: अयोध्येतील परिस्थितीची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी लष्कराला तैनात करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आणि विहिंप व अन्य हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी अयोध्येत लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी अयोध्येत लष्कराला तैनात करण्याची मागणी केली. अखिलेश यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, भाजप सर्वोच्च न्यायालय किंवा संविधान मानत नाही. भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेश विशेषत: अयोध्येत जे वातावरण तयार झाले आहे, त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी आणि येथे लष्कराला पाचारण करावे, असे अखिलेश यांनी म्हटले.
तत्पूर्वी आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आम्हाला बाबरी मशीद पाडायला फक्त १७ मिनिटं लागली मग केंद्र सरकारला राम मंदिराच्या उभारणीसाठी संसदेत अध्यादेश आणायला इतका वेळ का लागत आहे, असे आक्रमक विधान त्यांनी केले होते.
या एकूणच वातावरणामुळे अयोध्येतील नागरिकही धास्तावले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरामध्ये पुढील काही दिवस पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा साठा केलाय. एखादा अनुचित प्रसंग उद्भावल्यास गैरसोय होऊ नये म्हणून नागरिकांकडून ही खबरदारी घेतली जात आहे.
तर दुसरीकडे अयोध्येतील महत्वाच्या ठिकाणी ब्लॅक कॅट कमांडोही तैनात करण्यात आले असून शहरात जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पोलिस आणि ब्लॅक कॅट कामांडोंबरोबरच राज्य राखीव दलाच्या ४८ कंपन्याही अयोध्या आणि फैजाबादमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. गप्तचर विभागाचे अधिकारीही साध्या वेशात तैनात असून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा खास मंत्रालयातून घेतला जात आहे.