हिमालय पर्वताविषयीची धक्कादायक माहिती समोर
निसर्गाने दिला सतर्कतेचा इशारा
काठमांडू : सूर्याचा दाह वाढू लागल्यानंतर बर्फाच्छादित पर्वतरांगांकडे सर्वांची पावलं वळतात. परिणामी देशाच्या उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची रिघ लागू लागली आहे. पण, याच परिस्थितीमुळे भविष्यात मात्र काही मोठी संकटं ओढवली जाऊ शकतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका निरिक्षण अहवालातून ही बाब समोर आली आहे.
वाढती गर्दी आणि जागतिक तापमानवाढ पाहता गेल्या काही वर्षांच्या निरिक्षणाच्या आधारे ही बाब समोर आली आहे की हिमालयातील जवळपास साडेसहाशे ग्लेशिअर धोक्यात आहेत. हे ग्लेशियर वितळण्याचं प्रमाण हे दुपटीने वाढलं आहे.
सायन्स ऍडव्हान्सेस जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निरिक्षणानुसार १९७५ ते २००० या वर्षांदरम्यान हे हिमालयीन ग्लेशियर दहा इंचांनी घटले होते. पण, २००० ते २०१६ मध्ये मात्र ते २० इंचांनी घटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कोलंबिया विश्वविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या संशोधकांच्या गटाने उपग्रहाच्या माध्यमातून टीपण्यात आलेल्या जवळपास ४० छायाचित्रांचा आधार घेत हे निष्कर्ष मांडले आहे. या निरिक्षणात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार भारत, चीन, नेपाळ आणि भूटान या देशांच्या क्षेत्रात येणाऱ्या हिमालय पर्वताला सध्याच्या हवामानामुळे धोका निर्माण झाला असून, हे पर्वत वितळण्याचा वेग हा दुपटीने वाढला आहे.
हिमालय पर्वत वितळत असल्यामुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होत ज्यामुळे याचे थेट परिणाम पृथ्वीवरील जैवविविधतेवर होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही एकंदर परिस्थिती पाहता आता हिमालय पर्वताच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं उचलत मानवी कृत्यांमुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास थांबवण्याची गरज असल्याचाच मुद्दा प्रकर्षाने डोकं वर काढत आहे.