नवी दिल्ली : सीमेलगतच्या भागात Pok पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीला आजवर भारताकडून सातत्यानं सडेतोड प्रत्युत्तर देण्य़ात आलं आहे. पण, ही घुसखोरी मात्र काही केल्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलातील अतिरिक्त महासंचालक सुरिंदर पनवार यांनी याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा इशारा देत देशाला सतर्क केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास २५० ते ३०० सशस्त्र घुसखोर हे लाँच पॅडवर देशाच्या नियंत्रण रेषेनजीकच्या भागातून घुसखोरी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. असं असलं तरीही मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मात्र हे प्रमाण कमी असल्याची माहितीसुद्धा पनवार यांनी दिली. 


मागील वर्षी १४० घुसखोरांनी देशाची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. तुलनेनं यंदाच्या वर्षी मात्र हा आकडा २५-३० च्या घरात आहे. नियंत्रण रेषा भागात बर्फवृष्टी होऊन मार्ग बंद होण्यापूर्वीच हे प्रयत्न केले जाणार असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पण, सुरक्षा दलही हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तयार असल्याची माहिती पनवार यांनी दिली. 


 


दरम्यान,  भारतात घुसखोरी करण्यासाठीचा कट रचण्यासाठी ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याची माहिती गुप्तहेरांकडून समोर आली आहे. दहशतवाद्यांचे ५ गट माछिल भागात लाँच पॅडवर हजर आहेत. सोनार, लोसार, केरन, शेर खान टॉप या भागांमध्येही अशाच संशयास्पद हालचाली सुरु असल्याचं वृत्त आहे. त्यामुळं सध्याच्या घडीला नियंत्रण रेषेनजीक कमालीचं तणावाचं आणि सावधगिरीचं वातावरण पाहायला मिळत आहे.