नवी दिल्ली : ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडून (AIMPLB) मशिदीत महिलांच्या प्रवेशाचं जाहीर समर्थन करण्यात आलंय. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करून मशिदीत महिलांच्या प्रवेशाला आपला कोणताही आक्षेप नसल्याचं सांगितलंय. मशिदीत महिलांना कोणत्याही अडथळ्याविना प्रवेशाची परवानगी असल्याचं बोर्डानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्लाम धर्म मशिदीत महिलांना प्रवेश आणि प्रार्थना करण्याची परवानगी देतो. परंतु, या मुद्यावर अंतिम निर्णय मशिद व्यवस्थापक समिती निर्णय घेते, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय.


मशिदीच्या व्यवस्थापन बोर्डाच्या नियंत्रणात नसतं, त्यामुळे बोर्ड मशिदीच्या व्यवस्थापक कमिटीच्या लोकांना आपल्या स्तरावर कोणताही आदेश किंवा निर्देश देऊ शकत नाही, असंही बोर्डानं म्हटलंय.


सबरीमला प्रकरणात पुनर्विचार याचिका


केरळच्या सबरीमला मंदिरात कोणत्याही वयाच्या महिलांना प्रवेश देण्यासंबंधी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बोर्डानं सर्वोच्च न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपिठासमोर सबरीमला मंदिरात कोणत्याही वयाच्या महिलेला प्रवेश देण्याची परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी सुरू आहे. 


या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं सबरीमला मंदिरासोबतच इतरही धर्म समुदायाच्या धार्मिक स्थळांमध्ये महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा जोडलाय. धार्मिक मान्यतांदरम्यान न्यायालयाचा हस्तक्षेप कितीपत योग्य आहे? यावर अगोदर सर्वोच्च न्यायालयात विचार-विनिमय होणार आहे.