अलाहाबाद : अयोध्येमध्ये ५ ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका अलाहाबाद हायकोर्टाने रद्द केली आहे. साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलाहाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत साकेत गोखले यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम हा अनलॉक-२ च्या गाईडलाईनचं उल्लंघन असल्याचं म्हणलं होतं. साकेत गोखलेंनी दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये भूमिपूजन कोविड-१९ च्या अनलॉक-२च्या गाईडलाईनचं उल्लंघन आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमात तीनपेक्षा जास्त लोकं एकत्र येतील, त्यामुळे नियमांचं उल्लंघन होईल, असं नमूद केलं होतं. 


राम जन्मभूमिचा कार्यक्रम झाल्यास कोरोनाच्या संक्रमणाचा धोका वाढेल. कोरोनाच्या काळात गर्दी होईल, म्हणून बकरी ईदला सामूहिक नमाज पठणाला परवानगी दिलेली नाही, मग भूमिपूजनला परवानगी कशी दिली जाऊ शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करुन गृहमंत्रालयाच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे, असं साकेत गोखले झी मीडियाशी बोलताना म्हणाले. साकेत गोखले हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात.