मुंबई : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव होता. अखेर रविवारी या तणावाचं रुपांतर हाणामारीत झालं. काही बुरखाधारी गुंडांनी हॉस्टेलमध्ये धुडगूस घातला. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी संध्याकाळी लाठी-काठ्या, लोखंडी सळया आणि चाकू घेऊन ५० ते १०० जणांच्या जमावानं हल्ला केला. सर्वांनी आपली तोंडं झाकली होती. साबरमती हॉस्टेलमध्ये या गुंडांनी अक्षरशः हैदोस घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २-३ दिवसांपासून एबीव्हीपी आणि डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये तणाव होता. डाव्या संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी रजिस्ट्रेशन सर्व्हरची तोडफोड केल्यानंतर तणाव वाढला. पेरियार हॉस्टेलमध्ये संध्याकाळी ४च्या सुमारास वादाला तोंड फुटलं. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या साध्या वेशातल्या पोलिसांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. 


त्यानंतर काही व्हॉट्सअॅप ग्रूप तयार करण्यात आले. या ग्रुपच्या माध्यमातून प्लॅन तयार करण्यात आला. हॉस्टेलमध्ये दोन्ही बाजूचे विद्यार्थी असल्यामुळे कोडवर्ड ठरवण्यात आले. आपला कोण आणि दुसरा कोण हे या कोडवर्डवरून निश्चित होणार होतं. हल्ला सुनियोजित असल्याचं यामुळे स्पष्ट होतं आहे. जेएनयू स्टुडंट युनियनची अध्यक्ष ऐश घोष हिलाही मारहाण झाली. आता डाव्या संघटना आणि एबीव्हीपीकडून परस्परांवर आरोप केले जात आहेत. 


पोलिसांनी या हल्ल्याबाबत एफआयआर नोंदवला असून काही हल्लेखोरांची ओळख पटल्याचंही बोललं जातंय. विद्यापीठातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांशी चर्चा केली आहे.


जेएनयूमधल्या या घटनेनंतर देशभरात विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. हल्ला कुणी केला हे तपासात स्पष्ट होईलच, मात्र जेएनयूसारख्या प्रथितयश विद्यापीठामध्ये झालेली ही गुंडगिरी निश्चितच भूषणावह नाही.