भोपाळ: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना गुरुवारी एका जाहीर कार्यक्रमात अश्रू अनावर झाले. यावेळी साध्वी प्रज्ञा यांनी उपस्थितांना तुरुंगात असतानाचे आपले अनुभव सांगितले. आपल्याला पोलिसांनी बेकायदेशीरपणे १३ दिवस कोठडीत ठेवले होते. या काळात अगदी पहिल्या दिवसापासून पोलिसांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. अनेकदा पट्ट्याने आणि उलटे टांगून पोलीस मला मारायचे, मला शिव्याही द्यायचे, असे साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले. हे अनुभव सांगताना साध्वी प्रज्ञा यांना रडू कोसळले. मात्र, भविष्यात दुसऱ्या कोणत्याही महिलेवर अशी परिस्थिती येऊ नये, असे साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर १०१ जण जखमी झाले होते. 




मात्र, बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असूनही साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिल्यावरून भाजपवर जोरदार टीका होत आहे. मालेगाव बॉ़म्बस्फोटातील एका मृताच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. या मृताच्या वडिलांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ( एनआयए) विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये साध्वी प्रज्ञा या निवडणुकीला कशा उभ्या राहू शकतात, असा सवाल त्यांनि विचारला.