Wayanad Landslide: केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामध्ये आतापर्यंत 334 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अचानक झालेल्या भूस्खलनामुळे शेकडो घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान, पीडितांच्या मदतीसाठी सेलिब्रिटीही पुढे येत आहेत. 'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुनने वायनाड भूस्खलनग्रस्तांना मदत करण्याची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्लू अर्जुनने ट्विट करत वायनाडमध्ये भूस्खलनाबद्दल तीव्र दु: ख व्यक्त केलं आहे. त्याने 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याने म्हटलं आहे की, वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनामुळे मला खूप दु: ख झाले आहे. केरळने मला नेहमीच खूप प्रेम दिले आहे. आता मला पुनर्वसन कार्यासाठी केरळच्या मुख्यमंत्री मतद निधीमध्ये 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याने ट्विटमध्ये केरळच्या मुख्यमंत्री कार्यलयाच्या X खात्यालाही टॅग केले आहे. 



6 दिवसांपासून बचावकार्य सुरु


गेल्या 6 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मुसळधार पावसामुळे देखील तेथील काही मदत कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, ते खंबीरपणे उभे राहून लोकांचा शोध घेत आहेत. असा अंदाज आहे की, अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. 


मोहनलाल यांच्याकडून 3 कोटींची मदत 


मल्याळम सिनेमाचा सुपरस्टार मोहनलाल यांनी काल घटनास्थळी भेट दिली आहे. मोहनलाल यांना इंडियन टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टिनेंट कर्नल पद मिळाले आहे. बचावकार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी परिस्थिती समजून घेतली. एका पोस्टमध्ये त्यांनी लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. मोहनलाल यांनी या आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी 3 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.