पूजा मक्कर, झी २४ मीडिया, नवी दिल्ली : सरकारी बैठकीतून बिस्किटांना हद्दपार करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी हा निर्णय घेतला आहे. आता बिस्किटांऐवजी चणे, बदाम आणि अक्रोड अधिकारी आणि नेत्यांना खायला देण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी बैठक म्हटली तर चहा बिस्किटांचा कार्यक्रम आलाच. बैठक सुरू होण्यापूर्वीच नेते चहा आणि बिस्किटं आणण्याचं फर्मान सोडतात. पण आता चहासोबतची बिस्किटांची गट्टी तुटण्याची शक्यता आहे. सरकारी बैठकीतून चहासोबतच्या बिस्किटांना आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सरकारी बैठकीत चहासोबत बिस्किट न देण्याचा निर्णय घेतला आहे.


बिस्किटातल्या मैद्यामुळे शुगर वाढते, तसंच लठ्ठपणाही वाढतो. आरोग्यदायी सवयींची आता आरोग्य मंत्रालयापासूनच सुरुवात करण्यात आली आहे. आता बैठकीत लाह्या चणे, भाजलेले चणे, खजूर, बदाम आणि अक्रोड दिले जाणार आहेत. सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचं डॉक्टरांनी स्वागत केलं आहे.


सरकारी बैठकांमध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्याही न ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. बिस्किटांची हद्दपारी असो किंवा प्लास्टिक बाटलीबंदी या निर्णयाची सर्वच पातळ्यांवर अंमलबजावणी व्हावी हीच अपेक्षा आहे.