मुंबई : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी 'अमेझॉन'चा संस्थापक जेफ बेजोस आधुनिक इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलाय. त्याची एकूण संपत्तीची मोजदाद १५० अरब डॉलरच्या पलिकडे पोहचलीय. बेजोस यांच्याकडे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस यांच्या संपत्तीपेक्षा ५५ अरब डॉलरहून अधिक संपत्ती आहे. 'ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्स'कडून ही माहिती देण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच ५४ वर्षीय बेजोस यांना 'फोर्ब्स'नं सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं होतं. १९९९ मध्ये बेजोस यांच्या संपत्तीनं काही काळासाठी १०० अरब डॉलर्सचा आकडा पार केला होता. ज्याची किंमत आजच्या काळात १४९ अरब डॉलर आहे. अशा पद्धतीनं अमेझॉनचा संस्थापक बेजोस १९८२ पासून आत्तापर्यंतच्या इतिहासात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलाय. 


यंदाच्या वर्षात बेजोस यांच्या एकूण संपत्तीत ५२ अरब डॉलरची वाढ झालीय. ही वाढ 'आशियातले सर्वात श्रीमंत व्यक्ती' असलेल्या मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा अधिक आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ४४.३ अरब डॉलर इतकी आहे. 


'ब्लूमबर्ग इंडेक्स'च्या या यादीत ९५.५ अरब डॉलर संपत्तीसहीत बिल गेटस दुसऱ्या क्रमांकावर तर ८३ अरब डॉलर संपत्तीसहीत गुंतवणूकदार वॉरेन बफेट तिसऱ्या स्थानावर आहेत. 


उल्लेखनीय म्हणजे, बिल गेटस यांनी आपल्या संपत्तीतील मोठा भाग 'बिल अॅन्ड मेलिंडा गेटस् फाऊंडेशन'ला दान दिलाय. त्यांनी ही संपत्ती दान केली नसती तर आज त्यांची संपत्ती १५० अरब डॉलरहून अधिक असती...