अमेझॉनला मोठा दिलासा, रिलायन्स आणि फ्यूचर समूहाला मोठा झटका
Amazon-Future-Reliance case: सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court) निर्णयाने रिलायन्स उद्योगाला मोठा झटका बसला आहे.
मुंबई : Amazon-Future-Reliance case: सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court) निर्णयाने रिलायन्स उद्योगाला मोठा झटका बसला आहे. भारतातील आघाडीचा उद्योगसमूह रिलायन्स आणि किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसायातील फ्यूचर समूह यांच्या होऊ घातलेल्या महत्वाचा करार सर्वोच्च न्यायालयाने रोखला आहे. सिंगापूरमधील लवादाने दिलेला निकाल भारतातही लागू होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने अमेझॉनला मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे रिलायन्स समूह आणि फ्यूचर समूहाला मोठा झटका बसला आहे. प्रसिद्ध फ्यूचर समूहाचे भारतातील काही किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसायातील मालकी हक्क रिलायन्स समूहाने विकत घेतले होते. तब्बल 24 हजार 713 कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला होता. मात्र, रिलायन्स आणि फ्यूचर समूहात झालेल्या या व्यवहाराला अमेझॉन कंपनीने विरोध केला होता.
फ्यूचर रिटेल आणि रिलायन्स रिटेल यांच्यामध्ये प्रस्तावित असलेल्या विलिनीकरणाला सिंगापूरस्थित न्यायालयाने स्थगिती दिली होती. या निर्णयाची अमलबजावणी करण्यात यावी, अशी याचिका अमेझॉनने केली होती. फ्यूचर ग्रुपने आपला रिटेल, होलसेल, लॉजिस्टिक्स आणि गोडाऊचा व्यवसाय रिलायन्सला विकण्याचा करार केला होता. तसेच फ्यूचर समूहाच्या कंपनीत अमेझॉनची 49 टक्के मालकी आहे. त्यामुळे या व्यवहारानुसार जर कंपनी विकली जाते. त्यावेळी ती खरेदी करण्याचा अधिकार अमेझॉनकडे येतो. पण, रिलायन्स-फ्यूचर करारात याचे पालन झालेले नाही, असे अमेझॉन म्हटले होते.