Amazon कडून 500 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू; पाहा कोणकोणत्या विभागांवर टांगती तलवार
Amazon lay offs : गेल्या काही महिन्यांपासून जागतिक अर्थव्यवस्थेवर असणारं मंदिचं संकट काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. त्यात मोठं भांडवल आणि कारभार असणाऱ्या संस्था सातत्यानं कर्मचारी कपात करताना दिसत आहेत.
Amazon lays off : मागील वर्षापासून म्हणजेच 2022 च्या शेवटापासूनच अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीला सुरुवात झाली. जागतिक आर्थिक मंदीचं कारण पुढे करत अनेक प्रतिष्ठीत संस्थांनी विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना नारळ दिला. ट्विटर, मेटा, अॅपल आणि अॅमेझॉनचा यात समावेश. मुख्य म्हणजे अॅमेझॉनमध्ये सुरु असणारं नोकरकपातीचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसल्यामुळं नव्यानं या कंपनीशी जोडल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांनाही आता धडकी भरत आहे. कारण, पुन्हा एकदा अॅमेझॉनकडून कर्मचारी कपात करण्यात आली असून, आता 500 भारतीय कर्मचाऱ्यांना कंपनीकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला सिअॅटलमधील टेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या या कंपनीनं 500 भारतीय कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला असून, येत्या काळातही ही प्रक्रिया सुरुच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. अॅमेझॉन वेब सर्विस, ह्युमन रिसोर्स, सपोर्ट फंक्शन या आणि अशा इतर काही विभागांतील कर्मचाऱ्यांना नोकरीला मुकावं लागू शकतं. किंबहुना हा आकडा 1 हजारांवर जाऊ शकतो अशी माहिती प्रतिष्ठीत माध्यम समुहानं प्रसिद्ध केली आहे.
जागतिक पातळीवर 9 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरी जाणार...
मार्च महिन्याच्या अखेरीस अॅमेझॉनचे सीईओ अँडी जेसी यांनी कर्मचारी कपातीचं धोरण जारी केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी कंपनीतील 9 हजार कर्मचाऱ्यांना याचा फटका बसू शकतो असं स्पष्ट केलं होतं. सध्या झालेली नोकरकपात हा त्याच निर्णयाचा एक भाग असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेसुद्धा वाचा : पुढच्या 48 तासांत महाराष्ट्रात उकाडा वाढणार, Monsoon च्या आगमनाची तारीखही पाहून घ्या
दरम्यान, अॅमेझॉनच्या प्रवक्त्यांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. भारतातून अॅमेझॉननं मागील वर्षभरामध्ये फूड डिलीव्हरी, होलसेल वितरण आणि edtech अशा काही शाखा बंद केल्या होत्या.
का घेतला जातोय नोकर कपातीचा निर्णय?
गुगल असो किंवा अॅमेझॉन, ज्या संस्थांनी कर्मचाऱ्यांना गजगंड पगाराच्या नोकऱ्या दिल्या, त्याच संस्था आता या कर्मचाऱ्यांशी असणारं नातं तोडताना दिसत आहेत. त्यातच सध्याच्या घडीला जाहीरातबाजी आणि Royalty कमी होत असल्यामुळं या कंपन्या प्रभावित होताना दिसत आहे. जोपर्यंत अर्थार्जनाच्या या वाटा खुल्या होत्या, तोपर्यंत कंपन्यांनी कर्मचाऱ्यांवर मोठा खर्च केला. पण, मागील वर्षभरात Advertisment Royalty कमी झाली, कोरोना महामारीचे परिणामही इथं कारणीभूत ठरले. ज्यामुळं कंपन्यांनी नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याऐवजी जुन्या कर्मचाऱ्यांना नोकरीवर काढण्याचा निर्णय घेतला.