`ऍमेझॉन` देणार नोकरीची संधी; भारतात ५०,००० लोकांना मिळणार रोजगार
देशांसमोर बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे भारतातील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. देशांसमोर बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. अशात 'ऍमेझॉन'ने देशात ५० हजार नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यादरम्यान होम डिलेव्हरीची मागणी वाढल्याने कंपनीला कंत्राटी कामगारांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. ऑनलाईन वस्तूंनी मागणी वाढल्यामुळे गोष्टींची डिलेव्हरी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केले जाणार असल्याचे कंपनीने शुक्रवारी स्पष्ट केलं.
भारतात लॉकडाऊन चैथ्या टप्प्यात आहे आहे. या टप्प्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सरकारने काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. कंटेंटमेंट झोन वगळता ग्रीनबरोबर ऑरेंज आणि रेड झोनमध्येही डिलेव्हरी देण्याची परवानगी ई-कॉमर्स कंपन्यांना दिली आहे. त्यामुळे ऑनलाईन वस्तूंची मागणी वाढत आहे.
याच पार्श्वभूमीवर ॲमेझॉनच्या कस्टमर फुलफीलमेंट सेंटर ऑप्रेशन्स विभागाचे उपाध्यक्ष असलेल्या अखिल सक्सेना यांनी, 'कंपनीने फुलफीलमेंट सेंटर आणि डिलेव्हरीसंदर्भातील कामांसाठी ५० हजार नोकऱ्यांची भरती काढली आहे. शिवाय या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल.' असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून ॲमेझॉन कंपनीने अनेक उपाय योजना आखल्या आहेत. कर्मचारी आजारी पडल्यास त्याच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही. शिवाय सिक लिव्ह वाढवणे, कंपनीत प्रवेश करताना कर्मचाऱ्यांचे तापमान तपासून पाहणे यासारख्या गोष्टी कंपनीच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत .