पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची ऑफर Ambika Soni यांनी नाकारली
अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री होण्यास नकार दिला आहे.
चंदीगड : पंजाबमध्ये राजकीय भूकंप झाले असून काँग्रेसने आज विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती, ज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर निर्णय घेतला जाईल. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पदासाठी अद्याप एकमत न झाल्याने बैठकीच्या वेळेत बदल झालाय. इतंकच नाही तर अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री होण्यास नकार दिला आहे.
मुख्यमंत्री पदासाठी ही नावं चर्चेत
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अंबिका सोनी यांनी पंजाबच्या राजकारणात येण्यास नकार दिला. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठीही त्यांचा नकार आहे. तर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड़ आणि सुखजिंदर सिंह रंधावा यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह पत्रकार परिषदेत म्हणाले, "मी सकाळीच निर्णय घेतला होता. हे सोनिया गांधींनाही सांगितलं होतं. हे माझ्याबरोबर तिसऱ्यांदा घडतंय. मला इथे अपमानित वाटत आहे. आता ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे, ते त्याला मुख्यमंत्री बनवतील.
"मी राजकारणात 52 वर्षे पूर्ण केली आहेत. मी साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री आहे. पण दोन महिन्यांत तीन वेळा भेटून पक्षाने ज्या प्रकारे माझ्यावर दबाव आणला त्यावरून मला अपमानित वाटलं आहे," असंही ते म्हणालेत.
इमरान खान आणि बाजवा हे नवज्योत सिंह सिद्धू यांचे मित्र आहेत. पाकिस्तानातून दररोज ड्रोन आणि ग्रेनेड येतात. त्यामुळे सिद्धू यांना मुख्यमंत्री केलं तर मी विरोध करेन. दरम्यान मी अद्याप कोणत्याही पक्षाशी बोललो नाही, असंही अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलंय.