धक्कादायक! गर्भवती महिलेला खांद्यावर घेऊन 3 किमीची पायपीट
गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी तब्बल 3 किलो मीटरची पायपीट करावी लागली.
मध्य प्रदेश : देश कितीही प्रगतीची पावले चालला असला तरीही अद्याप ग्रामीण भागात सोयी सुविधा पोहोचवण्यात तो खुपच मागे आहे. कारण आजही अनेक ग्रामीण भागात लाईट नाही, पाण्याची सुविधा नाही, गावापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही आहे. या सर्व सोयीसुविधांपासून अजूनही ग्रामीण भाग वंचित आहे. त्यामुळे या नागरीकांना आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या घटनेत पाहा ना एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी तब्बल 3 किलो मीटरची पायपीट करावी लागली. आधीच प्रसुतीच्या वेदना त्यात असुविधे अभावी होणारी वेदना वेगळीच. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडिया हळहळ व्यक्त होत असून प्रशासनावीर टीका होतेय.
मध्य प्रदेशच्या बेहरा टोला गावातील गर्भवती महिलेला प्रसुतीच्या वेदना होत होत्या. महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका बोलावली होती. मात्र गावाच्या आत जाणारा रस्ताच खराब असल्याने रुग्णवाहिका घरापर्यंत नेणे अवघड बनले होते. त्यामुळे रुग्णवाहिका नेता आली नाही. महिलेला स्ट्रेचरवरून आणण्यासारखी परिस्थिती नव्हती. मात्र पेशंटला आणणे फार गरजेचे होते.
दरम्यान रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी पायी गर्भवती महिलेच्या घरात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गर्भवती महिलेला बांबुला दोरी बांधून खाटेसह खांद्यावर लटकवून घेऊन आणले. तब्बल या गर्भवती महिलेला आणि कर्मचाऱ्यांना अवघड अशी 3 किलोमीटरची पायपीट करावी लागली. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र घुघरी येथे आणण्यात आले. यानंतर तिच्यावर आरोग्य केंद्रात यशस्वी प्रसुती करण्यात आली.
रुग्णवाहिका सेवेतील पायलट कोमल कार्तिकेय, आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ राजेश छटा आणि सहवैमानिक योगेंद्र राजपूत यांचे या घटनेनंतर विशेष कौतुक करण्यात आले. कारण अतिशय बिकट परीस्थितीतून या गर्भवती महिलेला रूग्णालयात पोहोचवण्यात आले होते. त्यामुळे रूग्णवाहिका कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. तसेच या कामात ग्रामस्थांनीही त्यांना खूप मदत केली.
दरम्यान महिलेला चादरीच्या झोळीतून आणताचा हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने नेटीझन्सच्या डोळयात पाणी आणले आहे. तसेच अनेक नेटकरी प्रशासनावर टीका करत आहेत.