नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण दोघांमधील वाद टोकाला पोहोचले आहेत. दोघा देशांतील तणावाचा परिणाम तेलाच्या किंमतीवर दिसत आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर रविवारी सलग चौथ्या दिवशी वाढले. दिल्लीमध्ये चार दिवसात पेट्रोल ४० तर डिझेल ५५ पैसे प्रति लीटरने महागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणता दिलासा मिळणार नाही. तेल विक्रेत्या कंपन्यांनी रविवारी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमतीत  नऊ पैशांनी वाढ जारी केली. डिझेलच्या किंमतीमध्ये दिल्ली, चेन्नई आणि कोलकातामध्ये ११ पैशांनी वाढ झाली. तर मुंबईमध्ये डिझेल १२ पैसे प्रतिलीटरने महागले आहे. 


इंडीयन ऑईलच्या वेबसाईटनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर वाढून क्रमश: ७५.५४ रुपये, ७८.१३ रुपये, ८१.१३ रुपये आणि ७८.४८ रुपये प्रति लीटर झाले आहे. चार शहरांमध्ये डिझेलची किंमत वाढून क्रमश: ६८.५१ रुपये, ७०.८७ रुपये, ७१.८४ रुपये आणि ७२.३९ रुपये प्रति लीटर झाले आहे.



इराकवर हल्ला 


अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला चढवला असून यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशीरा अमेरिकेने बगदाद एअरपोर्टवर हल्ला चढवत इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारलं.