निवृत्ती मोहन, झी मीडिया, अंदमान निकोबार : अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये सध्या भारताची अंदमान निकोबार बेटं गाजतायत. अंदमानमध्ये आदिवासींना ख्रिस्ती धर्माच्या जाळ्यात ओढण्यासाठी आलेल्या अमेरिकन नागरिकाची हत्या झालीय, त्याचा मृतदेह पुरून टाकलाय अशी चर्चा रंगली आहे. पाहूया नेमका काय प्रकार आहे.  अंदमान आणि निकोबार बेटसमुहातील नॉर्थ सेंटिनल द्वीप...जितकं शांत आणि सुंदर... तेवढचं खतरनाक...नॉर्थ सेंटीनल बेटं निसर्ग सौंदर्यामुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत असतील पण या बेटांवर जाण्यास संपूर्णपणे बंदी आहे. असं म्हटलं जातं या द्वीपांवर जो गेला तो परतलाच नाही... २७ वर्षांचा अमेरिकन नागरिक जॉन अॅलनसोबत असंच काहीसं झालंय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी जॉन अॅलन या बेटावरील आदिवासींना भेटण्यासाठी गेला. १४ नोव्हेंबरला पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे १६ नोव्हेंबरला ५ मच्छिमारांसह तो पुन्हा या बेटांवर पोहोचला. 


जॉन अॅलनने आदिवासींसाठी काही भेटवस्तूही नेल्या मात्र इथल्या आदिवासींनी बाण मारून जॉनला ठार मारला. त्यानंतर आदिवासींनी त्याचा मृतदेह समुद्र किनारी वाळूत पुरून टाकल्याचे अंदमानचे डीजीपी  दीपेंद्र पाठक यांनी सांगितले. 


चिठ्ठी सापडली 


सेंटीनल  बेटांवर जाण्याआधी त्यांनी आपल्या परिवारासाठी एक चिट्ठी लिहीली होती. मी वेडा आहे असा तुमचा समज होऊ शकतो.


पण इथल्या लोकांना जीजसबाबत सांगणं गैर होणार नाही असं मला वाटतं. मला ठार केलं तर आदिवांसींवर राग काढू नका, पण हे देवा मी मरू इच्छित नाही.


पोलीस हेलिकॉप्टरद्वारे मृतदेहाचा शोध घेत आहेत. मात्र आदिवासी पोलिसांचं हेलिकॉप्टर बेटांवर उतरू देत नाहीयेत.


पोलिसांनी आत्तापर्यंत ७ जणांना अटक केलीय. जॉनला त्या बेटांवर नेणाऱ्या मच्छिमारांनाही अटक झालीय.


सेंटीनल आदिवासी


नॉर्थ सेंटीनल बेटं राजधानी पोर्ट ब्लेअरपासून ५० किलोमीटर दूर आहेत. या बेटांवर राहणाऱ्या आदिवासींना सेंटीनल आदिवासी म्हटलं जातं.


आजवर या आदिवासींचा इतर कोणत्याही मानवी समुहांशी संपर्क आलेला नाही. या बेटांवर केवळ १०० आदिवासी राहतात असं म्हटलं जातं.


यातल्या कोणाचाही इतर जगाशी आयुष्यात संबंध आलेला नाही. या बेटावर जाण्यास सर्वांनाच मनाई आहे. या बेटावरील आदिवासींवर कोणताही खटला भरता येत नाही.


धार्मिक आक्रमण 


सेंटीनल आदिवासींना लॉस्ट ट्राईब हा दर्जा देण्यात आलाय. २००४ साली आलेल्या सुनामीनंतरही या आदिवासींच्या मदतीसाठी कोस्ट गार्डची हेलिकॉप्टर्स गेली. पण आदिवासींनी या हेलिकॉप्टर्सवर बाणांचा अक्षरशः पाऊस पाडला.


त्यामुळे या आदिवासींना जॉनचा वावर खटकल्यामुळे त्याला मारून टाकण्यात आल्याचा संशय आहे.


मात्र त्याचसोबत आदिवासींवर होत असलेल्या धार्मिक आक्रमणाचा मुद्दाही आता जगासमोर आलाय.