लग्नाच्या आधी चिंतेत असलेल्या अमेरिकन तरुणीने मानले राष्ट्रपतींचे आभार
राष्ट्रपतींचं या अमेरिकन तरुणीला सर्वात मोठं गिफ्ट
कोच्ची : अमेरिकेच्या तरुणीची भारतात लग्न करण्याची इच्छा होती. यासाठी तिने ८ महिने वेगवेगळ्या जागा पाहिल्यानंतर कोच्चीमधील ताज मालाबार हॉटेल बूक केलं होतं. हा विवाह ७ जानेवारीला ठरला होता. संपूर्ण तयारी झाली होती. पण अचानक लग्नाच्या आधी ४ जानेवारीला हॉटेलकडून तिला अशी बातमी मिळाली की, तिच्या चिंता वाढल्या.
हॉटेलकडून एशलेला सांगण्यात आलं की, त्यांचा विवाह सोहळा त्यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट करावा लागेल. कारण भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कोच्ची दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांचा विवाह तेथे होणं शक्य नव्हता. त्यामुळे एशलेच्या चिंता वाढल्या होत्या. त्यानंतर तिने एक ट्विट केलं. तिने म्हटलं की, 'तुम्ही भारतात डेस्टीनेशन वेडिंगसाठी प्लान बनवतात. नेमकं तेव्हाच त्याच हॉटेलमध्ये लग्नाच्याच दिवशी भारताच्या राष्ट्रपतींचा दौरा ठरतो. त्यामुळे लग्नाची तयारी करण्यासाठी फक्त ४८ तास मिळतात.'
५ जानेवारीला सकाळी एशलेने राष्ट्रपती भवन आणि ताज मालाबार हॉटेलला टॅग करत पुन्हा ट्विट केलं. तिने म्हटलं की, राष्ट्रपती भवन तुम्ही तुमच्या सुरक्षा टीमसोबत आमची मदत करु शकतो. ज्यामुळे आम्हाला ताज हॉटेलमधील आमचं लग्न ४८ तासात दुसऱीकडे हलवावं नाही लागणार?
राष्ट्रपती भवनकडून याबाबत कोणतीही ट्विटवर प्रतिक्रिया नाही आली, पण १२ तासानंतर एशलेने एक आणखी ट्विट केलं. ज्यामध्ये तिने म्हटलं होतं की, 'मी ताज हॉटेल आणि अधिकाऱ्यांचे आभार मानते. कारण त्यांना दिवसभर काम केलं. मला आशा आहे की, माननीय राष्ट्रपती यांच्या आशीर्वादामुळे आमचं लग्न आणखी छान होत आहे.'
यावर राष्ट्रपती भवनने उत्तर दिलं की, 'आम्हाला आनंद आहे की, हा मुद्दा सूटला. राष्ट्रपती कोविंद यांनी या मंगल प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत.' ताज मालाबार यांनी देखील ट्विट करत एशचं धैर्य आणि राष्ट्रपती भवन यांच्याकडून मिळालेल्या सहयोगाचं कौतूक केलं.
७ जानेवारीला एशलेने लग्नाचा फोटो ट्विट करत सगळ्यांचे आभार मानले. तिने म्हटलं की, मी महामहिम राष्ट्रपती यांची उदारता आणि दयाळूपणा यामुळे कृतज्ञ आहे. तुमचे खूप-खूप आभार. मी खूप काही शिकले. अतिथि देवो भव #एश वेड्स अभि.'