अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल टाकल्याच्या घटनेला आज ५० वर्ष पूर्ण झाली. मानवी इतिहासातील या सर्वात मोठ्या घटनेचा सुवर्णमहोत्सव केवळ अमेरिकाच नव्हे, तर जगभरात साजरा केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोव्हीएत रशिया आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध ऐन रंगात असताना अवकाशावर सत्ता मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली. रशियाने स्पुटनिक आणि युरी गागारीन यांना अंतराळात पाठवल्यावर त्यावर कुरघोडी करणं अमेरिकेला आवश्यक झालं. त्यातूनच अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष जे.एफ. केनेडी यांनी २५ मे १९६१ रोजी चंद्रावर मानव पाठवण्याची ऐतिहासिक घोषणा केली आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' झपाट्य़ाने कामाला लागली. 


दरम्यान केनेडींची हत्या झाली. मात्र नासाच्या निश्चयात खंड पडला नाही. मर्क्युरी, जेमिनी या मानवी अवकाश मोहिमा झाल्या. चंद्रावर उपग्रह पाठवून या अज्ञात स्थळाची माहिती गोळा झाली...आणि नंतर अपोलो मोहिमांच्या मदतीने अमेरिकेने चांद्रविजय मिळवला.


१६ जुलै १९६९ रोजी दुपारी एक वाजून ३२ मिनीटांनी 'अपोलो ११' मोहिम सुरु झाली. सॅटर्न ५ या २९७० टन वजनाच्या आणि ११० मीटर उंचीच्या अंतराळ यानाने अवकाशात झेप घेतली. उड्डाणचं थेट प्रक्षेपण ३२ देशांमधील २५ कोटी नागरिकांनी बघितलं. ५५ देशांचे साडेतीन हजार पत्रकार त्यावेळी उपस्थित होते. 


३ दिवसांच्या प्रवासानंतर यान चंद्राजवळ पोहचलं आणि चांद्र प्रदक्षिणा घालू लागलं. २० जुलैला 'इगल' नावाचा भाग मुख्य यानापासून वेगळा झाला आणि त्याचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला. २० जुलै रोजीच 'इगल' चांद्रभुमीवर उतरलं. 


'इगल'मधील सर्व यंत्रणा तपासल्यानंतर ६ तास ३९ मिनीटांनी नील ऑर्मस्ट्रॉग चंद्रावर उतरले आणि त्यांनी इतिहासातलं आजवरचं सर्वात प्रसिद्ध वाक्य उच्चारलं... 'वन स्मॉल स्टेप फॉर मॅन...' 


त्यानंतर १९ मिनीटांनी बझ ऑल्ड्रीनही चंद्रावर उतरले. सुमारे अडीच तास चांद्रभुमीवर घालवल्यावर दोघे पुन्हा इगलमध्ये परतले आणि मायकेल कॉलीन्स या तिसऱ्या अंतराळवीरासह 'अपोलो ११'मधून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. २४ जुलै संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पॅसिफिक महासागरात 'कोलंबिया' या अवकाश कुपीद्वारे ते पृथ्वीवर सुखरुप परत आले.


या मोहिमेमुळे सोव्हिएत रशियाविरुद्ध अंतराळ स्पर्धेत अमेरिकेने बाजी मारली. अपोलो ११च्या संगणक नियंत्रित करणाऱ्या प्रणालीची क्षमता स्मार्ट फोनपेक्षा कमी होती.
या मोहिमेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या चार लाख शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ-अभियंता यांचा सहभाग होता.


चंद्रावर उतरताना इगल यानात केवळ २५ सेकंद पुरेल एवढंच इंधन बाकी होतं. ऑर्मस्टॉग साडेतीन फुट उंचीवरुन चांद्रभुमीवर उतरले. या घटनेचं थेट प्रक्षेपण जगांत ६० कोटी लोकांनी बघितलं. चंद्रावरुन परतल्यानंतर तिन्ही अंतराळवीरांना वैद्यकीय चाचण्यांसाठी दोन आठवडे सुरक्षित कुपीत ठेवण्यात आलं होतं.


अपोलो ११ मोहिम फसल्यास पर्यायी भाषणही अमेरिकच्या अध्यक्षांनी तयार ठेवलं होतं. एवढ्या धोक्याच्या मोहिमेपूर्वीही अंतराळवीरांचा अपघात विमा काढण्यात आला नव्हता. चंद्रावरील केवळ साडेएकवीस किलो माती आणि दगडच या मोहिमेत पृथ्वीवर आणता आले.


आता अवकाश तंत्रज्ञान आणि संगणक प्रणाली अतिशय विकसित झाली आहे. मात्र ५० वर्षांपूर्वी या दोन्ही गोष्टी बाल्यावस्थेत असताना एवढी महत्त्वाकांक्षी मोहीम आखणं आणि ती फत्ते करणं हा एक वैज्ञानिक चमत्कारच म्हणावा लागेल. नील आर्मस्ट्राँग म्हणाले अगदी तसंच... मानवजातीसाठी ही एक मोठी झेप ठरली आहे.