अमेठीत राहुल गांधी आणि स्मृती इराणींमध्ये चुरशीची लढत, पाहा पुढे कोण?
स्मृती इराणी राहुल गांधी यांचा पराभव करणार का?
अमेठी: गांधी घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठीत यंदा काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील प्रतिष्ठित लढतींपैकी एक म्हणून अमेठीच्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. या मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना रिंगणात उतरवले होते. यंदा स्मृती इराणी यांच्याकडून संपूर्ण ताकद लावून अमेठीत प्रचार करण्यात आला होता. मात्र, स्मृती इराणी अमेठीत राहुल यांचा पराभव करणार का, याबाबत अनेकांना साशंकताच होती. मात्र, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी सुरुवातीच्या सत्रापासून आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली. दुपारपर्यंत अनेक फेऱ्या होऊनही स्मृती इराणी यांनी ही आघाडी टिकवून ठेवली आहे. सध्या स्मृती इराणी ११२२६ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे या मतदासंघात शेवटच्या क्षणापर्यंत कडवी टक्कर पाहायला मिळू शकते.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये देशभरात भाजपला मोठे यश मिळाले आहे. भाजप पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवेल, असे आतापर्यंतच्या कलांवरून स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे पुन्हा पानिपत झाले आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) १०० पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप २०१४ पेक्षा मोठा विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असून त्यांची ही कामगिरी ऐतिहासिक मानली जात आहे.