अम्फान वादळाचा कोलकाता विमानतळाला तडाखा, रनवे पाण्याखाली
पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठी नासधूस
कोलकाता : ताशी 160 ते 180 किमीच्या वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठी नासधूस झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळामुळे 10 ते 12 जण ठार झाल्याची माहिती आहे. कोलकाताच्या अनेक भागात पूर आला आहे. कोलकाता विमानतळावर या वादळाचा परिणाम दिसतोय. इथे सर्वत्र पाणी भरलेलं आहे.
6 तासांच्या अम्फान या वादळ वाऱ्यामुळे कोलकाता विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे. सगळीकडे पाणी भरले आहे. रनवे आणि हॅंगर्स पाण्यात बुडाले आहेत. विमानतळाचा एक भाग पाण्याखाली आहे. अम्फानमुळे विमानतळावरील सर्व कामकाज आज पहाटे पाच वाजेपर्यंत बंद होती, जी अजूनही बंद आहेत.
कोलकाता विमानतळावरील प्रवासी उड्डाणे 25 मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहेत. वंदे भारत मिशनला जाण्यासाठी फक्त मालवाहतूक आणि उड्डाणे सुरू होती. त्यांनाही थांबविण्यात आले आहे. विशेष म्हणजे बंगालमधील समुद्रकिनार्यावर धडक देताना अम्फानच्या वादळाची गती ताशी 180 किमीपेक्षा अधिक होती.
कित्येक तास कोलकाता शहरात ताशी 130 किमी वेगाने वारे वाहत राहिले. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगना, दक्षिण 24 परगना, मिदनापूर आणि कोलकाता येथे अम्फानचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. वादळाचा तडाखा इतका होता की उभे राहणेही शक्य नव्हते.
पश्चिम बंगालमधील वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत अजून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असे म्हणत आहेत की कमीतकमी 10-12 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतेक मृत्यू झाडे पडल्याने झाले आहेत. त्याचवेळी ओडिशामध्ये तीन लोक ठार झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही राज्यात मदत व बचावकार्य सुरू आहे.