नवी दिल्ली :  देशभरात Coronavirus कोरोना विषाणूची लागण झालेल्यांचा आकडा आता ९३५२ वर पोहोचला आहे. मागील चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत ९०५ने वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत असल्याचं चिंतातूर वातावरण असतानाच यामध्ये एक दिलासादायक वृत्त आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलं. देशातील १५ राज्यांतील जवळपास २५ जिल्ह्यांमध्ये मागील दोन आठवड्यांपासून एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. 


कोरोनाग्रस्तांचा भारतातील वाढता आकडा ,हा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. पण, यामध्येच ठराविक राज्यांमधील काही भागांमध्ये कोरोना नियंत्रणात असल्याची बाब समोर आली आहे. आतापर्यंत देशात जवळपास दोन लाख नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शिवाय येत्या सहा आठवड्यांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठीचं आवश्यक साहित्य उबलब्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. 


दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्याची अधिकृत माहितीही देण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत हा कालावधी वाढवण्यात आला आहे. 


 


केरळमध्ये दिलासा.... 


भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला होता. ज्यानंतर मुख्यमंत्री पीनरई विजयन यांच्या सरकारकडून या विषाणूशी लढण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली गेली. परिणामी केरळमध्ये तब्बल १७९ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, आता कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या अवघी १९४ इतकी असल्याचं कळत आहे.