भोपाळ: सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ग्वाल्हेरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा सुरू आहे. या सभेत मोहन भागवत आणि अमित शाह या दोन नेत्यांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली. भाजपा अध्यक्ष अमित शाह प्रतिनिधी सभेत शनिवारपासून उपस्थित आहेत. प्रतिनिधी सभेत संघ आणि भाजपा यांच्यातील समन्वयाबाबत चर्चा झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघ सक्रिय झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतिनिधी सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे सहसचिव भैय्याजी जोशी यांनीदेखील केंद्र सरकारविषयी विश्वास व्यक्त केला. त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटले की, सत्तेत असणाऱ्या लोकांचा राम मंदिराला विरोध आहे, असे आम्हाला वाटत नाही. राम मंदिराविषयीच्या त्यांच्या कटिबद्धतेवर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. १९८०-९० पासून राम मंदिरासाठी जनआंदोलन सुरु आहे. त्यामुळे मंदिर पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील. न्यायालय हा खटला लवकरात लवकर निकाली काढेल, अशी अपेक्षाही भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केली. 


दरम्यान, निवडणूक आयोगाकडून आज (रविवारी) लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आयोगाकडून आज संध्याकाळी पाच वाजता दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ५४३ जागांसाठी ७ ते ८ टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान १० एप्रिलआधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, १६ व्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जूनला संपत आहे. २०१४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांची तारीख ५ मार्चला जाहीर झाली होती. तेव्हा ७ एप्रिल ते १२ मे या कालखंडात ९ टप्प्यात मतदान झाले होते. या निवडणुकांसाठी महाराष्ट्रात तीन टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता आहे. १२ ते १५ मे दरम्यान मतमोजणीची होऊन निकाल जाहीर होऊ शकतो.