नवी दिल्ली :  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात येईल अशी शक्यता होती. कारण अयोध्येत राम मंदिराची उभारणी, हा गेल्या अनेक निवडणुकांमधील प्रचाराचा मुद्दा राहिला आहे. २०१४च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'अच्छे दिन' आणि विकासाचा मुद्दा प्रमुख होता, पण 'मंदिर वही बनाएंगे' हे आश्वासनही भाजपने दिले होते. २०१९ च्या निवडणुकांच्या आधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरु होईल, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी हैदराबादमध्ये केल्याचे वृत्त आले होते. मात्र आता भाजपने या भूमिकेवरुन पलटी मारली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरु होईल, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले. मात्र, राम मंदिर-बाबरी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशात अमित शाह यांनी हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता भाजपने या भूमिकेवरून यू टर्न घेतला आहे. असे काहीही वक्तव्य अमित शाह यांनी केले नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आलेय. तसे ट्विट करण्यात आलेय. 



हैदराबादमध्ये झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत राम मंदिराचा विषय अजेंड्यावरही नव्हता, असं ट्विट पक्षाने केलंय. त्यामुळे राम मंदिराबाबत भाजप इतका सावध पवित्रा का घेतोय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी, हा गेल्या अनेक निवडणुकांमधील प्रचाराचा मुद्दा राहिला आहे.  गेल्या चार वर्षांत ठोस असे काहीच झालेले नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या आधी त्यादृष्टीने हालचाली होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.


२०१९ मधील लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराचं काम सुरू करण्याचे सूतोवाच शाहा यांनी केल्याचे एका स्थानिक नेत्यानेच पत्रकारांना सांगितलं होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच. राजकारण सुरु झाले. त्यानंतर भाजप एकदम बॅकफूटवर गेलाय.