अमित शहांनी बंगालमध्ये भाडोत्री गुंड आणले; तृणमूल काँग्रेसचा आरोप
अमित शहा यांच्या या रोड शो दरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.
कोलकाता: अमित शहा यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्यान मंगळवारी झालेल्या राड्यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. अमित शहा यांच्या या रोड शो दरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या रोडशोवर कुठे दगडफेक करण्यात आली तर कुठे रस्त्यावरच आग लावून रोड शोचा निषेध करण्यात आला. तर अखेर महान समाजसेवक पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती.
यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले होते. मात्र, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी म्हटले की, पश्चिम बंगालमध्ये कोणालाही मिरवणूक किंवा रोड शो करण्याचा अधिकार आहे. मात्र, या सगळ्यात बाहेरील लोकांचे काय काम? अमित शहा यांनी त्यांच्यासोबत तेजिंदर बग्गा या व्यक्तीला का आणले होते? दिल्लीत कोणाच्यातरी कानशिलात लगावल्याप्रकरणी या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. अमित शहा बाहेरून अशा भाडोत्री गुंडांना घेऊन आल्याचा आरोप डेरेक ओब्रायन यांनी केला.
या घटनेचे काही व्हीडिओ समोर आले आहेत. त्यावरून अमित शहा खोटं बोलत असल्याचे सिद्ध होते. आम्हाला याबाबत बिलकूल आश्चर्य वाटत नाही. यावेळी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. हे कृत्य कोणी केले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मात्र, काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार पंडित ईश्वरचंद्र यांची मूर्ती तोडली जात असताना आक्षेपार्ह घोषणाही देण्यात आल्या. आता भाजपचे नेते या हल्ल्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप डेरेक ओब्रायन यांनी केला.
तर दुसरीकडे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग निपक्षपातीपणे वागत नसल्याची तक्रार केली. तृणमूल काँग्रेसने केलेल्या हिंसाचाराविरोधात निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे.