नवी दिल्ली :  गोऱखपूर बालमृत्यू हत्याकांडाची देशभर चर्चा होत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे नवनिर्वाचीत सदस्य अमित शहा यांनी या हत्याकांडावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'गोरखपूरमधील घटना ही देशातील काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही देशात अशा प्रकारच्या खूप साऱ्या दुर्घटना घडल्या आहेत', असे वक्तव्य शहा यांनी केले आहे. या घटनेत अनेक बालके दगावली असल्याने देशात आगोदरच हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहा यांना अनेकांच्या रोषाचे आणि टीकेचे धनी व्हावे लागण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाल्याने 70 हून अधिक बालके दगावली आहेत. या घटनेवर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित शहा यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, पूढे बोलताना शहा म्हणाले, 'एखाद्या घटनेवरून राजीनामा मागणे हे कॉंग्रेसचे कामच आहे. पण, ही काही पहिलीच वेळ नाही. या आधीही अशा घटना घडल्याच आहेत,'असे अमित शहा यांनी म्हटले आहे.


दरम्यान, गोरखपूर घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी पूढे आली होती. मात्र, घटनेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या घटनेबाबत एसआयटी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुख्य न्यायाधीश जे एस शेखर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने फेटाळली आहे. ही याचिका दाखल करणाऱ्या  वकिलाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आपली तक्रार मांडावी असेही सांगण्यात आले आहे.