नवी दिल्ली : २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवत सत्तासोपाण चढलेल्या भाजपला आता २०१९चे वेध लागले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी बोलावलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत त्याबाबत संकेत देण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही पक्षनेत्यांची नेहमीसारखीच बैठक असल्याचे सांगितले जात असले तरी, या बैठकीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. देशात लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठ्या संख्येने जागा जिंकल्या. पण, १५० अशा जागा आहेत तीथे भाजपला पराभव स्विकारावा लागला. अशा जागांबाबत आतापासून प्रयत्न करायला हवेत, असे अमित शहा म्हणाले. या वेळी भाजपला पराभूत जागांवर विजय मिळवता येऊ शकतो अशा जागांचे शहा यांनी सादरीकरणही केले.


भाजप मुख्यालयात झालेल्या या बैठकीत अनंत कुमार, रवीशंकर प्रसाद, नरेंद्रसिह तोमर, जे.पी.नड्डा, पीयूष गोयल, धर्मेंद प्रधान, निर्मला सीतारमण, मनोज सिन्हा, प्रकाश जावडेकर आणि अर्जुन मेघवाल या मंत्र्यांसह ३१ नेते उपस्थित होते. शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ३५० हून अधिक जागा जिंकण्याचे पक्षाचे लक्ष्य असल्याचे या वेळी सांगितले.


दरम्यान, या आधी भाजपचे कमळ फुलू न शकलेल्या पश्चिम बंगाल, ओडिश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांतील जागांचा या बैठकीत खास उल्लेख करण्यात आला. विशेष म्हणजे कमालीच्या गुप्ततेत ही बैठक पार पडली. प्रत्यक्ष बैठकीत सहभागी होईपर्यंत बैठकीला येणाऱ्या मंत्री आणि नेत्यांनाही बैठकीत काय चर्चा होणार याबाबत माहिती नव्हती असे समजते. तसेच, बैठकीनंतरही कोणत्याच नेत्याने यासंबंधी माध्यमांशी चर्चा केली नाही. यावरूनच बैठकीच्या गुप्ततेबाबत कल्पना येते.