मुंबई : देशभरात लॉकडाऊन सुरु असताना आणि कोरोना व्हायरसची दहशत असताना मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर मात्र दुपारनंतर हजारोंच्या संख्येने कामगारांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. याप्रकरणी सध्या सर्वच स्तरात चर्चा सुरू आहे. कोरोना सारख्या धोकादायक विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. या सर्व परिस्थितीत वांद्रे जमावासारखे प्रकार घडू नये यासाठी आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. 
 
वांद्रे जमाव प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. फोनवरुन त्यांनी याप्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. असे प्रकार घडल्यास कोरोनाविरूद्ध लढाई अधिक कमकुवत होईल आणि या सर्व परिस्थितीत वांद्रे जमावासारखे प्रकार घडू नये यासाठी आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असं देखील ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करत लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. त्याचे तिव्र पडसाद वांद्रे स्थानकाबाहेर पडसाद उमटताना दिसले.