लोकसभा, विधानसभा एकत्र घेण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी, काँग्रेस, तृणमूलचा विरोध
भाजपची ही रणनीती यशस्वी ठरली तर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होतील, अशी शक्यता
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसोबतच ११ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केलीय... 'एक देश, एक निवडणूक' अशी भाजपची संकल्पना असून, त्यादृष्टीनं भाजपनं चाचपणी सुरू केलीय. मात्र, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांनी याला विरोध केला आहे.
...तर महाराष्ट्रातही लोकसभा, विधानसभा निवडणुका
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आजच विधी आयोगाला पत्र पाठवून एकत्र निवडणुका घेण्याची मागणी केलीय.. भाजपची ही रणनीती यशस्वी ठरली तर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होतील, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हरयाणा, झारखंड, मिझोराम आणि बिहारमध्ये लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घ्याव्यात, असा भाजपचा आग्रह असल्याचं समजतंय.
काँग्रेस, तृणमूलचा ठाम विरोध
दरम्यान, भाजप लोकसभा, विधानसभा एकत्र घेण्याबाबत अन्य राजकीय पक्षांचं एकमत व्हावं, यासाठी भाजपनं खटाटोप सुरू केलाय... तसं झाल्यास संविधानात कोणताही बदल न करता, एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेता येऊ शकतात, असं भाजपचं म्हणणं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.... मात्र काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यासारख्या राजकीय पक्षांचा एकत्र निवडणुका घ्यायला ठाम विरोध आहे.