मुंबई : भारतीय राजकारणात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे गांधी कुटुंबाची, प्रियांका गांधी यांच्या नव्या राजकीय कारकिर्दीची. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिवपदी प्रियंका गांधी यांची नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आली. उत्तर प्रदेशातील पूर्वीय भागासाठी त्या महत्त्वे काम पाहणार आहेत. मुख्य म्हणजे भाजपाला तगडं आव्हान देण्यासाठीच काँग्रेसची ही खेळी असल्याचं मत राजकीय तज्ज्ञांनी मांडलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाच्या प्रतिक्रिया सर्वच क्षेत्रांमधून उमटल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका गांधी या राजकारणात खऱ्या अर्थाने सक्रिय झाल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव तर झाला. पण, सोबतच इथे पुन्हा गांधी कुटुंबाच्या राजकारणातील खेळीने सर्वांचच लक्ष वेधलं. या साऱ्यामध्ये अमूलकडून ही एक लक्षवेधी चित्र (कार्टून) साकारण्यात आलं. 



दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या अमूल समूहाकडून साकारण्यात आलेलं हो चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जात आहे. 'फॅमिली स्त्री', असं त्या चित्रात अगदी ठळकपणे लिहिण्यात आलं असून, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या भावा- बहिणीची जोडीही त्यावर साकारण्यात आली आहे. सोबतच 'फॉर भाईज अँड बेहेन्स', अशी सूचक ओळही लिहिण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील भावा- बहिणीच्या जोडीकडे एका वेगळ्या आणि तितक्याच कलात्मक पद्धतीने अमूलने भाष्य केलं आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.