नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी दुर्घटनेला बळी पडलेल्या वायुसेनेच्या एएन-३२ या विमानातील सर्व प्रवाशांचे मृतदेह सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागलेत. ३ जून रोजी आसामच्या जोरहाट विमानतळावरून या विमानानं उड्डाण घेतलं होतं. जोरहाटवरून हे विमान अरुणाचल प्रदेशातील मेन्चुका गावातील 'एडव्हान्स लॅन्डिंग ग्राऊंड'वर उतरणं अपेक्षित होतं. परंतु, उड्डाणानंतर मेन्चुकाजवळच्याच पेयुम भागात या विमानाचा संपर्क तुटला. पेयुम - टॅटो परिसरात हे विमान अचानक बेपत्ता झालं. या विमानात आठ क्रू मेम्बरसहीत १३ प्रवासी प्रवास करत होते. आज या सर्व जणांचे मृतदेह हाती लागलेत. यातील सात मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत आहेत. हे मृतदेह लवकरच त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवण्यात येतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुर्घटनाग्रस्त एएन ३२ विमानाचा कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि फ्लाईट डाटा रेकॉर्डर (एफडीआर) याअगोदरच हाती लागलेत. हे विमान अरुणाचलच्या लिपोपासून १६ किलोमीटर उत्तरेत आणि समुद्रतळापासून १२,००० फूट उंचीवर आढळलं होतं. या विमानाचे अवशेषही अपघातानंतर तब्बल आठ दिवसांनी आढळले होते. 


या दुर्घटनेत शहीद झालेल्यांमध्ये हवाई दलाचे सहा अधिकारी आणि सात एअरमन आहेत. या दुर्घटनेत विंग कमांडर जीएम चार्ल्स, स्काडर्न लिडर एच विनोद, फ्लाईट लेफ्टनंट आर थापा, फ्लाईट लेफ्टनंट ए तन्वर, फ्लाईट लेफ्टनंट एस मोहंती, फ्लाईट लेफ्टनंट एमके गर्ग, वॉरंट ऑफिसर केके मिश्रा, अनूप कुमार, शेरिन, लीड एअरक्राफ्ट मॅन एसके सिंह, लीड एअरक्राफ्ट मॅन पंकज, पुताली आणि राजेश कुमार हे शहीद झाले.



भारतीय वायुसेनेचं एएन - ३२ हे रशियन बनावटीचं विमान आहे. यापूर्वी जून २००९ मध्ये अरुणाचल प्रदेशातील वेस्ट सियांग प्रांतातील एका गावानजिक एएन-३२ विमान दुर्घटनेला बळी पडलं होतं. या दुर्घटनेतही १३ जणांनी आपला जीव गमावला होता. तसंच जुलै २०१६ मध्येही एका एएन-३२ विमानानं चेन्नईच्या पोर्ट ब्लेअरहून उड्डाण घेतलं... मात्र रस्त्यातच हेही विमान बेपत्ता झालं होतं. या विमानातून २९ जण प्रवास करत होते. या विमानाचा शोध काही महिने सुरू होता परंतु, अद्याप या विमानाचा आणि त्यातील प्रवाशांचा शोध लागलेला नाही