मुंबई : कोरोना महामारीने साऱ्या जगाच्या नाकी नऊ आणलेयत. कोरोना संपवणारी लस कधी येईल याची सर्वजण वाट पाहतायत. अनेक कंपन्यांनी दावा देखील केला पण प्रत्यक्ष चाचणीत त्या खऱ्या उतरु शकल्या नाहीत. कोरोनावरील तीन लसींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरु असल्याचे पंतप्रधानांनी लालकिल्यावरील आपल्या भाषणातून सांगितलंय. कोरोनावरील लस सर्वप्रथम शोधल्याचा दावा रशियाने केलाय. याच पार्श्वभुमीवर अमेरिकेतील फार्मा औषध कंपनीने कोरोना संपवण्यासाठी मलम उपयुक्त असल्याचा दावा केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एफडीए नोंदणीकृत असलेल्या नॉन प्रिस्क्रिप्शन ओव्हर द काऊंटर या मलमने कोरोना वायरस सहित अन्य विषाणुंच्या संक्रमणापासून देखील बचाव होईल असा दावा करण्यात आलाय. यासोबत उपचार आणि कोरोना संक्रमण संपवण्याची क्षमता या मलममध्ये असल्याचे सांगण्यात येतेय. 


टी३एक्स उपचारानंतर संक्रमण करणारा कोणता विषाणु न आल्याचे प्रयोगशाळेतील अहवालातून स्पष्ट झाल्याचे कंपनीने म्हटलंय.


हे एक महत्वपूर्ण संशोधन सिद्ध होईल. ज्यातून नाकाच्या वाटे कोरोना वायरस आत जाण्याची शक्यता कमी होईल असे एडवांस्ड पेनिट्रेशन टेक्नोलॉजीचे संस्थापक डॉ. ब्रायन ह्यूबर यांनी सांगितले.


कोरोना रुग्णसंख्येत वाढ
अनेक सक्तीचे नियम लागू केल्यानंतर देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याचं चित्र समोर येत आहे,. गेल्या २४ तासांमध्ये देशात ६९ हजार ८७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याचप्रमाणे ९४५ रुग्णांचा या धोकादायक विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. मात्र, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या विळख्यातून बाहर येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. 


देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २९ लाख ७५ हजार ७०२ इतकी झाली आहे. त्यापैकी ६ लाख ९७ हजार ३३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत २२ लाख २२ हजार ५७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ५५ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.