जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम (Kulgam) येथून बेपत्ता झालेला जवान अखेर सापडला आहे. रायफलमन जावेद अहमद वानी (Javaid Ahmad Wani) हा शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. यानंतर पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. अखेर जावेद अहमद वानीचा शोध लागला असून, जम्मू काश्मीर पोलिसांनीच ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 वर्षीय बेपत्ता लष्कर जवानाचा शोध लागल्याची माहिती देताना काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं आहे की, "कुलगाम पोलिसांना लष्कर जवान सापडला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याची संयुक्त चौकशी केली जाईल". दरम्यान पोलिसांनी अतिरिक्त माहिती दिलेली नाही. अधिक माहिती नंतर दिली जाईल असं त्यांनी पुढील ट्वीटमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे जावेद वानी नेमक्या कोणत्या स्थितीत आणि कुठे सापडला याची माहिती समोर आलेली नाही. 


नेमकं काय झालं होतं?


भारतीय लष्कराचा जवान जावेद अहमद वानी रजा घेऊन घरी आला होता. 30 जुलैला संध्याकाळी 6.30 वाजता खरेदी करण्यासाठी तो मार्केटमध्ये गेला होता. यावेळी आपली अल्टो कार घेऊन तो गेला होता. मात्र रात्री 9 नंतरही घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना मार्केटजवळ कार सापडली. कार लॉक नव्हती आणि आतमध्ये रक्ताचे डाग होते. तसंच त्याची चप्पलही पडलेली होती. यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस आणि लष्कराला याची माहिती दिली. यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं होतं. 


कुटुंबाने केलं होतं सुटकेचं आवाहन


25 वर्षीय जावेद लेहमध्ये कार्यरत होता. काश्मीर पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही संशयितांना अटक केली होते. दरम्यान, गाडीत रक्ताचे डाग आढळल्याने कुटुंबीय चिंतेत होते. कुटुंबीयांना दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचा संशयत होता. यामुळे त्यांनी व्हिडीओ जारी करत जावेदची सुटका करण्याची विनंती केली होती. 


"कृपया आम्हाला माफ करा. आमच्या मुलाला सोडून द्या, माझ्या जावेदला सोडा. मी त्याला पुन्हा लष्करात काम करु देणार नाही, पण त्याला सोडून द्या," अशी विनंती त्याच्या आईने केली होती.