भारत-कॅनडा वादात आनंद महिंद्रांचा मोठा निर्णय, कॅनडातील बिझनेस गुंडाळला!
कॅनडासोबतच्या तणावानंतर भारत सरकारने कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हासरी जारी केलीये.. कॅनडात जाणं टाळा तसंच दक्ष रहा अशी सूचना केंद्राने केलीय
anand mahindra : भारत-कॅनडा यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. कॅनडात जाताय, सावधगिरी बाळगा असा इशारा देत भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाचे दिशानिर्देश जारी केले आहे. तर, दोन्ही देशांच्या संपर्कात, व्हाईट हाऊसने देखील एक निवेदन जारी केले आहे. अशातच भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आनंद महिंद्रा यांनी कॅनडातील बिझनेस गुंडाळलं आहे.
आनंद महिंद्रांचा कॅनडाला जबरदस्त धक्का
भारत-कॅनडा वादाचा मोठा परिणाम आतंरराष्ट्रीय व्यवसायावर पहायला मिळत आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असतानाच आनंद महिंद्रा यांनी कॅनडाला जबरदस्त झटका दिला आहे. आनंद महिंद्रा यांची कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने कॅनडातून आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्रा अँड महिंद्राची उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने कॅनडामधून आपले कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे. महिंद्र अँड महिंद्रा कंपनीची रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनमध्ये 11.18 टक्के भागीदारी आहे. कंपनीने कॅनडामधील आपले कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे. कॅनडासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.
आनंद महिंद्रा यांच्या कंपनीने एका दिवसात कॅनडातील कामकाज बंद केले
आनंद महिंद्रा यांच्या कंपनीने एका दिवसात कॅनडातील कामकाज बंद केले आहे. रेसन कॉर्पोरेशन 20 सप्टेंबरपासून कॅनडामधील आपला व्यवसाय बंद करत असल्याची माहिती कंपनीने शेअर मार्केटमध्ये जाहीर केली. कामकाज बंद करण्यासाठी मंजुरीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे कंपनीने अवघ्या काही तासांत मिळवली आहेत. कंपनीला याबाबत महिंद्रा अँड महिंद्राने सांगितले की त्यांची कॅनडास्थित कंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने तेथे आपले कामकाज बंद केले आहे. कंपनीने स्वेच्छेने कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कॅनडातील बिझनेस बंद केल्याने महिंद्र अँड महिंद्राचे शेअर गडगडले
कॅनडातील बिझनेस बंद करण्याचा फटका महिंद्र अँड महिंद्रा कंपनीला शेअर बाजारात बसला आहे. कॅनडातील बिझनेस बंद केल्याने महिंद्र अँड महिंद्राचे शेअर गडगडले आहेत. महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 3 टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीचा समभाग अर्थात कंपनीचे शेअर 1584 रुपयांवरून घसरून 1575.75 वर बंद झाले. समभागांच्या घसरणीचा परिणाम कंपनीच्या मूल्यांकनावर झाला. या निर्णयामुळे कंपनीचे एका दिवसात 7200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सावध रहा... कॅनडात राहत असलेल्या भारतीयांना सूचना
दरम्यान, कॅनडाच्या ज्या भागात भारतीयांना लक्ष्य केलं जाऊ शकतं, तिथे जाणं टाळा. तसंच भारतीयांवर जिथे हल्ले झाले तिथे जाऊ नका. कॅनडात सावध रहा अशा सूचना केंद्र सरकारने दिल्यात.