फक्त 1 रुपयांत इडली, मजुरांची काळजी घेणाऱ्या इडली अम्माला आनंद महिंद्रा यांची अप्रतिम भेट
आनंद महिंद्रा यांनी पूर्ण केलं इडली अम्माचं स्वप्न
मुंबई : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मदर्स डे निमित्त इडली अम्माला एक अप्रतिम भेट दिली आहे. 85 वर्षीय इडली अम्मा तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील आहेत. अम्मा या भागात काम करणाऱ्या मजुरांना आणि इतरांना फक्त एक रुपयात इडली खाऊ घालते. इडली अम्माचे खरे नाव एम. कमलाथल आहे. जवळपास तीन वर्षांपासून त्या हे काम करत आहेत.
महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मदर्स डे निमित्त इडली अम्माला घर भेट दिले आहे. त्यांनी याबाबत आनंदही व्यक्त केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर लिहिले, 'मदर्स डेनिमित्त इडली अम्माला भेट देण्यासाठी वेळेत घराचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल आमच्या टीमचे खूप खूप आभार. इडली अम्मा ही आई, पालनपोषण, काळजी घेणारी आणि नि:स्वार्थ गुणांची मूर्ती आहे. त्यांना आणि त्यांच्या कार्याला पाठिंबा देणे हे आमचे सौभाग्य आहे. तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
इडली अम्मा यांनी घराची इच्छा व्यक्त केली होती
आनंद महिंद्रा यांनी यापूर्वीही इडली अम्माचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर इडली अम्माला गॅस शेगडी देण्यात आली होती. इडली अम्मा महिंद्राच्या टीमला भेटल्यावर त्यांनी घराची इच्छा व्यक्त केली.
महिंद्राच्या टीमने यावर काम केले. घर बांधण्यासाठी आधी जमिनीची नोंदणी झाली. मग महिंद्रा लाईफस्पेसेसने घरकाम केले.
मातृदिनाची इच्छा पूर्ण
आनंद महिंद्रा यांनी आज मदर्स डेच्या दिवशी इडली अम्माच्या घरची इच्छा पूर्ण केली. या घरात इडली अम्मासाठी खास स्वयंपाकघरही आहे.