UPSC की IIT JEE? आनंद महिंद्रा यांच्या प्रश्नानंतर IAS, IPS अधिकारी स्पष्टच बोलले...
Anand Mahindra on UPSC vs IIT JEE which is the toughest exam? : जगातील सर्वात आव्हानात्मक परीक्षा कोणत्या तुम्हाला माहितीये? पाहा याचं उत्तर....
UPSC vs IIT JEE which is the toughest exam? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा एक तरी मित्र किंवा मैत्रीण अनेकांच्याच ओळखीत असतो/ असते. जीवनातील काही महत्त्वाची वर्ष स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खर्ची घालवून यामध्ये उत्तीर्ण होऊन ध्येय्यपूर्ती करणाऱ्यांचा आकडा फार मोठा नाही. पण, अर्थात इथं लक्ष्यभेद करणं अशक्यही नाही हेसुद्धा दाखवून देणारी अनेक मंडळी आहेत.
स्पर्धा परीक्षा काहींसाठी कुतूहलाचा आणि काहींसाठी जिद्दीचा विषय असतात. जगभरात अशा कैक स्पर्धा परीक्षा आहेत. पण, भारताचं म्हणावं तर इथं IIT JEE आणि UPSC CSE या देशातील सर्वाधिक प्रतिष्ठीत आणि आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा समजल्या जातात. जगातील कठीण स्पर्धा परीक्षांच्या यादीतही या परीक्षांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण, महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाच्या आनंद महिंद्रा यांच्या एका X पोस्टनंतर मात्र सोशल मीडियावर वादाचं वातावरण तयार झालं आहे. कारण अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवर आपली मतही नोंदवली आहेत.
ऑक्टोबर महिन्यातच The World Ranking नं जगातील कठीण परीक्षांची यादी जाहीर केली होती. आता महिंद्रा यांनी त्याचसंदर्भात एक पोस्ट केली. '12th Fail चित्रपट पाहिल्यानंतर मी आजुबाजूला पाहिलं आणि आपल्या येथील आव्हानात्मक स्पर्धा परीक्षांसंदर्भात तरुणांशी संवाद साधला. त्यातला एक आयआयटी ग्रॅज्युएट होता, जो एका स्टार्टअपसोबत काम करतो, पण त्यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाचीही परीक्षा दिली आहे', असं त्यांनी लिहिलं.
हेसुद्धा वाचा : Valentine Day निमित्त 'या' Smartphones वर मिळतेय 40 टक्क्यांची सूट
आपलं म्हणणं इतरांना सांगताना त्यांनी युपीएसईची परीक्षा आयआयटी जेईईपेक्षा जास्त आव्हानात्मक आहे, पण मला आश्चर्य वाटतंय की सर्वसामान्यांचंही हेच मत असतानाच ही क्रमवारी काय सांगतेय? ती बदलली जाणं अपेक्षित आहे, ही भूमिका मांडली. महिंद्रा यांनी जी यादी शेअर केली आहे त्यामध्ये युपीएसईची परीक्षा आयआयटीपेक्षा कमी आव्हानात्मक आहे असं स्पष्टपणे दिसत आहे.
महिंद्रा यांनी ही पोस्ट करत आपले विचार मांडताच देशभरातील सनदी अधिकारी त्यावर आपली मतं मांडू लागले. 2018 वर्षातील उत्तीर्ण आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांनी युपीएसईची परीक्षा आव्हानात्मक का आहे याची नेमकी पाच कारणंही स्पष्ट केली. माजी IAS अधिकारी केबीएस सिद्धू यांनी पोस्ट करत हा एक समज नसून, UPSC ची परीक्षा अधिक आव्हानात्मक असणं हेच वास्तव आहे असं ठाम मत मांडलं.
आनंद महिंद्रा यांच्या एका पोस्टमुळं बड्या अधिकाऱ्यांनी स्पर्धा परीक्षांसंदर्भातली त्यांची मतं तरुणाईपुढं ठेवत त्यांना वास्तवाच्या आणखी जवळ नेण्याचं काम केलं असं म्हणणं गैर ठरणार नाही.