महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियावरुन ते काही व्हिडीओ शेअर करत, तसंच नेटकऱ्यांना उत्तर देत त्यांचं मनोरंजन करत असतात. आनंद महिंद्रा अनेकांसाठी आदर्श असल्याने त्यांच्या या पोस्ट व्हायरलही होत असतात. यामुळेच एक्सच्या माध्यमातून अनेकजण त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका चिमुरड्याच्या व्हिडीओने आनंद महिंद्रा यांचं लक्ष वेधून घेतलं. यावर त्यांनी दिलेल्या उत्तराचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या या गोड व्हिडीओत चिमुरडा आपल्या वडिलांना फक्त 700 रुपयांत थार कार खरेदी करु शकतो असं सांगताना दिसत आहे. चिकू यादव असं या मुलाचं नाव आहे. 1 मिनिट 29 सेकंदाच्या या व्हिडीओत तो आपल्या वडिलांशी संवाद साधत आहे. यामध्ये तो वडिलांकडे महिंद्रा थार कार विकत घेण्याची इच्छा व्यक्त करतो. पण त्याचा महिंद्रा थार आणि XUV700 यांच्यात गोंधळ झाला आहे. त्याला थार आणि  XUV700 ही एकच कार असल्याचं वाटतं. आपण शोरुममध्ये जाऊन 700 रुपयांत कार घेऊन येऊ या असं तो वडिलांना सांगतो. 


चिमुरड्याचा गैरसमज झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओने आनंद महिंद्रा यांचंही लक्ष वेधून घेतलं. मुलाच्या या व्हिडीओवर व्यक्त होताना, जर आम्ही 700 रुपयांत थार विकली तर दिवाळखोर होऊ असं उपहासात्मकपणे म्हटलं आहे.


"माझा मित्र तारापोरवाला याने हा व्हिडीओ पाठवा. मी त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर चिकूच्या प्रेमात पडलो आहे. माझी फक्त एकच समस्या आहे की, जर मी त्याची मागणी मान्य करत 700 रुपयांत कार विकली तर लवकरच दिवाळखोर होईन," असं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत. त्यांनी यासोबत चिकूचा व्हिडीओही शेअर केला आहे.



हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकजण या व्हिडीओच्या प्रेमात पडले असून, काहींनी आनंद महिंद्रा यांच्याकडे मुलाची इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली आहे. तर काहींनी आनंद महिंद्रा यांची व्हिडीओची दखल घेतल्याबद्दल स्तुती केली आहे. 


एका युजरने लिहिलं आहे की, "आनंद सर तुम्ही अपवादात्मक व्यक्तिमत्व आहात. एक महान भारतीय आणि यशस्वी उद्योजक. तुमच्यासाठी फार आदर असून, अनेकांसाठी आदर्श आहात".


तर एका युजरने सल्ला देत म्हटलं आहे की, "700 रुपये कमावण्याची चांगली कल्पना आहे. थार किंवा एक्सयुव्हीच्या खेळण्यातील गाड्या तयार करुन त्या 700 रुपयांत विकू शकतो. यामुळे मुलांचा एक चाहतावर्ग तयार होईल".


तर दुसऱ्याने तुम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून फक्त 700 रुपयांत मुलाला कार देऊ शकता असं सुचवलं आहे. तर काहींनी मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला गिफ्ट करा असं म्हटलं आहे.