रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये (Jamnagar) लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंटशी (Radhika Merchant) होणार आहे. सध्या त्यांचं संपूर्ण कुटुंब प्री-वेडिंगच्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र असून, उत्साहित आहे. दरम्यान अनंत अंबानी यांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत गप्पा मारताना अनेक गोष्टींचा उलगडा केला. यामध्ये त्यांनी बालपणीच्या आठवणींपासून ते राजकारणापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या व्यावसायिक प्रगतीत अंबानी कुटुंबाचा मोठा वाटा आहे. धीरुभाई अंबानी यांच्यानंतर मुकेश अंबानी आणि आता त्यांची मुलं हा वारसा पुढे नेत आहेत. अनंत अंबानी, आकाश अंबानी आणि ईशा अंबानी कुटुंबाच्या व्यवसायात सक्रीय असून, उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. दरम्यान अनंत अंबानी यांनी इतक्या मोठ्या कुटुंबाचे वारसदार असल्याचा आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचं सांगितलं आहे. 


"माझ्यावर कोणताच दबाव नाही. मला वाटतं, अशा कुटुंबात जन्म झाला हे माझं नशीब आहे. नशिबाने असे आई-वडील लाभले आहेत. त्यांनी मला लोकांसाठी चांगलं काम करण्याची शिकवण दिली आहे. तसंच भारतात नवे उद्योग उभारणंही शिकवलं आहे," असं अनंत अंबानी म्हणाले आहेत.


पुढे ते म्हणाले की, "माझे आजोबा आणि वडिलांनी रिलायन्सला वेगळ्या उंचीवर नेलं. आता माझ्या वडिलांचं व्हिजन पूर्ण करण्याची जबाबदारी मी, माझा भाऊ आणि बहिणीवर आहे".


आपलं वर्ल्ड-क्लास बिजनेस कुटुंब असलं तरी सर्वजण फार धार्मिक, अध्यात्मिक आणि सनातन धर्मावर आस्था असणारे असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "माझे वडील फार मोठे शिवभक्त आहेत. माझे वडील गणपतीची पूजा करतात. माझी आई नवरात्रीत सर्व नऊ दिवस व्रत ठेवते. माझी आजीही श्रीनाथाची भक्त आहे. आमच्या कुटुंबात प्रत्येकजण देवाचा भक्त आहे. आमच्याकडे जे काही आहे ते देवाने दिलं आहे. ईश्वर प्रत्येक ठिकाणी आहे असा आमचा विश्वास आहे. आमचं संपूर्ण कुटुंब सनातन धर्माला मानतं".


अनंत अंबानी राजकारणात येणार का?


अनंत अंबानी यांना यावेळी राजकारणात येणार का? असं विचारलं असता त्यांनी तात्काळ उत्तर देत आपल्याला काही रस नसल्याचं सांगितलं. 


दरम्यान जामनगरमध्ये सध्या हजारो पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सुरु आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती, सेलिब्रिटी आणि पॉप स्टार आहेत. अनेक दिग्गज या प्री-वेडिंग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, रजनीकांत यारखे अनेक दिग्गज हजर असणार आहेत. ग्लोबल पॉप स्टार रिहाना देखील परफॉर्म करणार असल्याची माहिती आहे. 1 ते 3 मार्चपर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत.