हैदराबादमध्ये एका उद्योजिकेने टीव्ही अँकरचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्याशी लग्न करण्यासाठी उद्योजिकेने हे कृत्य केलं. मॅट्रिमोनिअल साईटवर एका व्यक्तीने टीव्ही अँकरचा फोटो वापरला होता. महिलेने त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कारवर ट्रँकिंग उपकरण लावलं होतं. इतकंच नाही तर अपहरण करण्यासाठी सुपारीही दिली होती. टीव्ही अँकरने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तक्रार केली आहे. 31 वर्षीय आरोपी महिलेचा डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय आहे. तर पीडित तरुण एका म्युझिक चॅनेलमध्ये अँकर म्हणून काम करतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोगीरेड्डी ट्रीशा असं महिलेचं नाव आहे. ती पाच स्टार्टअप कंपन्यांची व्यवस्थापकीय संचालक आहे. तर प्रणव सिन्हा असं टीव्ही अँकरचं नाव आहे. मॅट्रिमोनिअल साईटवर भोगीरेड्डीची एका अज्ञात व्यक्तीने प्रणव असल्याचं भासवत 40 लाखांची फसवणूक केली होती. आपल्याला नव्या व्यवसायात गुंतवण्यासाठी पैसे हवे आहेत सांगत त्याने गंडा घातला होता. 


दोन वर्षांपूर्वी भोगीरेड्डी ट्रीशा मॅट्रिमोनिअल साईटवरील एका प्रोफाईलच्या संपर्कात आली होती. यामध्ये प्रणव सिन्हाचे फोटो वापरण्यात आले होते. भोगीरेड्डी ट्रीशाने त्याच्याशी संवाद साधणं सुरु केलं होतं. नंतर दोघे व्हॉट्सपअ, इंस्टाग्रामवरही संवाद साधत होते. यादरम्यान त्याने नव्या व्यवसायासाठी पैशांची गरज आहे सांगत 40 लाख रुपये तिच्याकडून मिळवले. पण नंतर त्याचा फोन बंद झाल्यानंतर तिला फसवणूक झाल्याचं समजलं. यानंतर तिने प्रणव सिन्हाशी इंस्टंट मेसेजिंग अॅपच्या आधारे संवाद साधला. 


प्रणव सिन्हाने तिला हे बनावट खातं असल्याचं सांगितलं. कोणीतरी आपल्या फोटोंचा वापर करुन बनावट खातं तयार केलं असून, आपण याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली असल्याची माहिती त्याने महिलेला दिला. पण यानंतरही भोगीरेड्डी ट्रीशा सतत त्याला मेसेज करत होती. यामुळे प्रणव सिन्हाने कंटाळून तिला ब्लॉक केलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


खरं तर हे प्रकरण तिथेच संपलं असतं. पण भोगीरेड्डी ट्रीशाने प्रणव सिन्हाशी लग्न करण्याचा निश्चय केला होता आणि यासाठी ती कोणतीही पातळी गाठण्यास तयार होती. आपण सगळं काही सुरळीत करु शकतो हा विश्वास असल्याने तिने थेट अपहरणाची योजना आखली. यासाठी तिने चौघांना सुपारी दिली होती असं पोलिसांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिने प्रणव सिन्हावर पाळत ठेवण्यासाठी त्याच्या कारवर ट्रँकिंग उपकरण लावलं, 


11 फेब्रुवारीला प्रणव सिन्हाचं चौघांनी अपहरण केलं. त्यांनी त्याला मारहाण केली आणि यानंतर भोगीरेड्डी ट्रीशाच्या कार्यालयात घेऊन गेले. त्याने तिच्या कॉल्सना उत्तर देण्याचं मान्य केल्यानंतरच सुटका करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


भोगीरेड्डी ट्रीशाने सुटका केल्यानंतर प्रणव सिन्हाने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत भोगीरेड्डी ट्रीशा आणि अपहरणकर्त्यांना अटक केली आहे.