Class X Boy Burnt Alive: आंध्रप्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याचा जिवंत जाळल्याची अमानुष घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे चार आरोपींपैकी तीन अल्पवयीन आहेत. बापटला जिल्ह्यातील ही घटना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी मयत तरुण सायकलवरुन ट्युशनसाठी जात होता. त्याचवेळी चार तरुणांनी त्याला घेरले व त्याच्यावर पेट्रोल टाकून नंतर आग लावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गु्न्ह्यात चार आरोपी असून त्यातील तिघे जण अल्पवयीन आहेत. अमरनाथ असं या तरुणाचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील काही जणांनी एका मुलाला मक्याच्या शेतात जिंवत जळताना पाहिले. आजूबाजूला सूनसान असल्याने कोणालाच काय घडलं याची माहिती नव्हती. गावकऱ्यांनी घटनेची माहिती लगेचच पोलिसांना दिली. तसंच, युवकाला जळताना पाहून लोकांनी आग विझवली तसंच, रुग्णवाहिकादेखील बोलवली. 


मात्र, युवकाची प्रकृती इतकी गंभीर होती की रुग्णालयात पोहोचण्याच्याआधीच त्याचा मृत्यू झाला. युवक ९० टक्के भाजला होता. मात्र मृत्यूपूर्वी त्याने एका 21 वर्षीय व्यक्तीचे नाव सांगितले होते. त्याला पोलिसांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. 


एका वृत्तसंस्थेनुसार, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातीलच काही तरुणांसोबत अमरनाथचे भांडण झाले होते. कारण अमरनाथ त्यातील एकाच्या बहिणीची छेड काढत होता. ती शाळेतून परतत असताना रोज तिला त्रास देत असे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. 


शुक्रवारी सकाळी सहा ते 6. 30च्या सुमारास अमरनाथला काही तरुणांनी रस्त्यातच अडवले. त्यावेळी तो ट्युशनला जात होता. तरुणांनी रस्त्यात अडवून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर ते त्याला घेऊन मक्याच्या शेतात  गेले. तिथे त्याच्या अंगावर पेट्रोल टाकले. अमरनाथने त्यांच्या तावडीतून सुटण्याचा अथक प्रयत्न केला. मात्र, चार जणांनी त्याला पकडून त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळले. 


गावकऱ्यांनी अमरनाथच्या किंकाळ्या ऐकून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात असताना पोलिसांनी त्याचा जबाब घ्यायचा प्रयत्न केला. मात्र, संपूर्ण जबाब देण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. अमरनाथच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 


चेरुपल्ली पोलिस स्थानकात आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस अज्ञातांविरोधात भारतीय दंहसहिता कलम 302 आणि 354 अंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. तसंच, या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्यानेच अमरनाथच्या अंगावर पेट्रोल टाकले की त्याला जीवे मारण्याच्या कटात तो सहभागी होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत.